पुणे : राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार मुंढवा जॅक्वेलमधून बेबी कॅनॉलमध्ये सोडल्या जाणाऱ्या पाण्याची पुन्हा एकदा तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी तातडीने पाण्याचे नमुने घेण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांनी दिली.मुंढवा जॅक्वेल प्रकल्पामधून शेतीसाठी सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे जलस्रोत खराब होत असून, हे पाणी शेतीसाठीही योग्य नाही, त्याची दुर्गंधी येत आहे, असा प्रश्न आमदार अनिल भोसले यांनी विधान परिषदेमध्ये बुधवारी उपस्थित केला. त्यावर बेबी कॅनॉलमधील पाण्याच्या नमुन्यांची पुन्हा एकदा तपासणी करण्याचे आदेश राज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिले आहेत.शासनाच्या आदेशाची तातडीने कार्यवाही केली जात आहे. मुंढवा जॅक्वेलमधील पाण्याचा दर्जा चांगला राहण्यासाठी पुणे शहराबरोबर पिंपरी-चिंचवडमधील सांडपाण्यावरही प्रक्रिया होणे आवश्यक आहे. मुंढवा जॅक्वेलमधून दिले जाणारे पाणी फक्त जलसिंचनासाठी वापरण्यायोग्य आहे. या पाण्यामुळे तेथील पाणीसाठे दूषित झाले नाही, तिथे साथीचे आजार पसरल्याच्या घटनांचीही नोंद नाही, असा अहवाल काही दिवसांपूर्वीच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिला आहे, अशी माहिती देशभ्रतार यांनी दिली. मुंढवा जॅक्वेल येथील पाण्याच्या नमुन्यांची दोन वेगवेगळ्या संस्थांकडून तपासणी करण्यात येणार आहे. तसेच कॅनॉलच्या बाजूला असलेल्या जलस्रोतांचीदेखील तपासणी केली जाणार आहे. सांडपाणी शुद्धीकरणासाठी जायका प्रकल्पांतर्गत मोठे प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर जॅक्वेलच्या पाण्याचा दर्जा आणखी सुधारू शकणार आहे.
मुंढवा जॅकवेलच्या पाण्याची पुन्हा एकदा तपासणी
By admin | Updated: March 18, 2016 03:13 IST