- जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यासंदर्भात शुक्रवारी उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णयाची शक्यता
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यात शहर आणि ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना कोट्यावधी रुपये खर्च करून उभारलेली जम्बो कोविड हाॅस्पिटल बंद आहेत. याबाबत मंगळवारी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या बैठकीत बंद पडलेली जम्बो कोविड हाॅस्पिटल पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढील एक आठवड्यात ही हाॅस्पिटल सुरू करण्यात येईल, असे राव यांनी स्पष्ट केले.
शहर आणि जिल्ह्यात खूप झपाट्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सुकाणू समिती बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील, पीएमआरडीएचे मुख्य अधिकारी सुहास दिवसे व संबधित आरोग्य अधिकारी उपस्थित होते. याबाबत राव यांनी सांगितले की, कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता जम्बो कोविड हाॅस्पिटल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी तातडीने या जम्बो हाॅस्पिटलचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेणे, खर्च कमी करण्यासाठी उपाययोजना करणे, पुढील तीन महिन्यांची तयारी ठेवणे, केवळ ऑक्सिजन बेड सुरू करणे आदी मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
शहर आणि जिल्ह्यात अधिक कडक निर्बंध लागू करण्याची वेळ आल्यास काय परिणाम होतील याचा अभ्यास करून अहवाल सादर करण्यास टाटा इन्स्टिट्यूटला सांगण्यात आले आहे. हा अहवाल आल्यानंतर शुक्रवारी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत या संदर्भात निर्णय घेण्यात येईल, असे राव यांनी स्पष्ट केले.