लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : न्यायालयात सुरु असलेला फौजदारी खटल्याचा निकाल बाजूने लावते असे सांगून एका महिलेच्या माध्यमातून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अर्चना जतकर यांची जामीनावर सुटका झाली आहे. दरम्यान, न्यायाधीशच मध्यस्थी महिलेला त्यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या जमिनी बाबतच्या दाव्यांची माहिती देत असल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे.
अर्चना जतकर आणि आणि लाच स्वीकारणारी महिला शुभावरी भालचंद्र, सुशांत बबन केंजळे आणि भानुदास ऊर्फ अनिल जाधव यांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. तर अजय गोपीनाथन याचा पोलिस शोध घेत आहेत. पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने न्यायदंडाधिकारी जतकर यांनी सोमवारी (दि.५) न्यायालयात हजर करण्यात आले होते.
जतकर यांनी तक्रारदारांकडून काही रक्कम स्वीकारली आहे काय? याबाबत चौकशी केली असता त्या उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. तसेच त्यांचा दुसरा नंबर असलेला मोबाईल कुठे आहे याबाबत देणारे स्पष्टीकरण न पटणारे आहे, असे सरकार पक्षातर्फे विलास घोगरे पाटील यांनी न्यायालयास सांगितले. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी त्यांची जामीनावर सुटका करण्याचे आदेश दिले. २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर. तसेच पोलिसांना तपासात सहकार्य करण्याच्या अटीवर जामीन मंजूर करण्यात आला. या गुन्ह्यातील अटक आरोपी आणि अर्जदार यांच्यात मोबाईलवरून १४७ वेळा संभाषण झाले आहे. न्यायदंडाधिकारी जतकर यांच्या मोबाईल क्रमांकाचे डीसीआर पोलिसांना मिळाले आहे. न्यायदंडाधिकारी जतकर यांनी गायकवाड यांना ह्य तक्रारदार यांच्या विरुद्धच्या केसमध्ये त्यांच्या बाजून काम करून देते, असे म्हणाल्याचे व्हॉइस रेकॉर्ड पोलिसांच्या हाती आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे गायकवाड हिने तपासादरम्यान न्यायाधीश देशमुख आणि अजय गोपीनाथन यांची नावे घेतली आहेत. त्याबाबत देखील पोलिस तपास करीत आहेत.