पुणे : कारागृह व सुधार सेवा विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांना वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण चांगलेच भोवले आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याबाबत तसेच वैष्णवीचा पती शशांक याला शस्त्र पुरविण्यात सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सुपेकर यांची अखेर मुंबईत होमगार्डच्या उपमहासमादेशकपदी तडकाफडकी बदली करण्यात आली. बदली करताना सुपेकर यांचे हे पदावनत करण्यात आले. त्यामुळे सुपेकर यांच्यावर मोठी नामुष्की ओढविली आहे.
गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात विलंब झाला, असा आरोप करण्यात येत होता. त्यात जालिंदर सुपेकर यांचा हात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता. हगवणे कुटुंबीय आपले दूरचे नातेवाईक असून या प्रकरणात आपला कोणताही सहभाग नसल्याचा खुलासा सुपेकर यांनी तातडीने केला होता. मात्र, यासंदर्भात राज्य सरकारलाही दखल घ्यावी लागल्याने गृहविभागाने गुरुवारी सुपेकर यांच्याकडील नाशिक, संभाजीनगर व नागपूर येथील उपमहानिरीक्षकपदाचा अतिरिक्त कार्यभार काढून घेतला होता.
सुपेकर विशेष पोलीस महानिरीक्षक असताना त्यांची बदली होमगार्डचे उपमहासमादेशक म्हणून करण्यात आली आहे. हे पद अवनत करून सुपेकर यांना देण्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर लगेच बदली
शशांक हगवणे याने शस्त्र परवान्यासाठी रहिवासाचे बनावट पुरावे दिल्याप्रकरणी शुक्रवारी (दि. ३०) गुन्हा दाखल करण्यात आला. हा परवाना देताना तत्कालीन अतिरिक्त आयुक्त म्हणून सुपेकर कार्यरत होते. त्यानंतर मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शस्त्र परवाना देण्यात सुपेकर यांचा सहभाग असल्यास त्यांच्यावर कारवाई करू, असे पुण्यात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले होते. फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याच्या काही मिनिटांतच सुपेकर यांच्या तडकाफडकी बदलीचे आदेश गृहविभागाने काढले.
नेपाळ सीमेवर आवळल्या नीलेश चव्हाणच्या मुसक्या
पिंपरी : वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रकरणी नीलेश चव्हाण याला शुक्रवारी पकडण्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांना दहा दिवसांनी यश आले. नेपाळ सीमेवरून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. वैष्णवीच्या मुलाची हेळसांड करणे, चुलत्यांसह इतरांना धमकावणे, याप्रकरणी चव्हाणवर गुन्हा दाखल होता. चव्हाणला पुण्यात आणले जाणार आहे. वैष्णवीचे बाळ नीलेशकडे होते. हे बाळ घेण्यासाठी नातेवाईक गेले असताना त्यांना बंदूक दाखवून धमकावले, अशी तक्रार कस्पटे कुटुंबाने केली. यानंतर चव्हाण याच्यावर दिनांक २१ मे रोजी गुन्हा दाखल झाला. अटक होण्याआधीच तो फरार झाला. त्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी त्याच्या शोधासाठी लूक आऊट नोटीस जारी केली. त्याची संपत्ती जप्त करण्यासाठी गुरुवारी नोटीस जारी केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी चव्हाण पोलिसांच्या जाळ्यात सापडला.
पुणे ते नेपाळ... नीलेश पोलिसांना कसा सापडला?
नीलेशने पुणे, मुंबई, कर्जत, रायगड असा प्रवास केला. रायगडनंतर नीलेश दिनांक २१ मे रोजी महाराष्ट्राबाहेर पडला. दिनांक २५ मे रोजी खासगी ट्रॅव्हल्सने गोरखपूर येथून दिल्लीला गेला. ज्या बसने तो प्रवास करीत होता, त्या बसमधील प्रवासाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते. त्यात नीलेश दिसून आला. स्लीपर सीटवरून उतरत असताना, हाती पाण्याची बाटली घेतलेला नीलेश चव्हाण फिरताना पाहायला मिळाला. त्यानंतर तो सोनोली (उत्तर प्रदेश), भैरवा (नेपाळ) आणि काठमांडू येथे पोहोचला. नेपाळमधून भैरवामार्गे सोनोलीमध्ये आल्यावर नीलेशला अटक केली.