पुणे : उरवडे येथे केमिकल कंपनीच्या आगीत मृत्युमुखी पडलेल्या लोकांची ओळख पटवण्यासाठी तीन दिवस लागणार आहेत. या घटनेसंदर्भात चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल आल्यानंतर आगीचे कारण स्पष्ट होणार असून, त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
उरवडे येथे एसक्यूएस ॲक्वा कंपनीला आग लागून १७ जणांचा मृत्यू झाला. या घटनास्थळी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भेट दिली. यानंतर माध्यमांशी बोलताना वळसे पाटील म्हणाले की, अतिशय दुर्दैवी घटना आहे. खासगी औद्योगिक वसाहतीतल्या या कंपनीत ज्वलनशील वस्तू असल्यामुळे १७ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. आग कशामुळे लागली? यासाठी समिती नेमली आहे. याचा अहवाल आजच प्राप्त होऊ शकतो. त्यानंतर कारण स्पष्ट होऊ शकेल आणि त्यानंतर प्राथमिक अहवाल प्राप्त झाला की गुन्हा दाखल केला जाईल.
दरम्यान, हे मृतदेह ओळखणे देखील अवघड झाले असल्याने या सर्वांची डीएनए चाचणी केली जाणार आहे, यासाठी तीन दिवस लागू शकतात. त्यानंतर मृतदेह ताब्यात द्यायचे की एकत्रित अंत्यसंस्कार करायचे? याचा निर्णय घेतला जाईल. दरम्यान, कंपनीचे मालक निकुंज शहा यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. प्राथमिक अहवाल मिळाल्यानंतर योग्य त्या कलमाखाली कारवाई केली जाईल.
चौकट
ौद्योगिक सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ते निर्णय घेतले जातील
पिरंगुट आेद्योगिक वसाहत ही खासगी आहे. या कंपनीत क्लोरिनडाय ऑक्साईड हे पाणी शुद्धीकरणाच्या गोळ्या बनवण्यासाठी वापरले जात होते. त्याचे पॅकिंग होत असताना ही आग लागली. उद्योगांच्या फायर ऑडिटसंदर्भात उद्योग मंत्र्यांशी चर्चा करून त्या संदर्भात माहिती घेतली जाईल. तसेच भविष्यात या प्रकारच्या घटना टाळण्यासाठी
योग्य ती पावले उचलण्यात येतील, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.
-----
फायर ऑडिट पॉलिसी ही अंमलात यायला हवी
सुप्रीया सुळे : प्रस्ताव मांडला असून दोन ते तीन महिन्यांत काम पूर्ण होण्याची अपेक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आेद्योगिक सुरक्षेच्या दृष्टीने फायर ऑडिट संदर्भात प्रस्ताव मांडण्यात आला होता. यासंदर्भात अजून निर्णय झाला नाही. मात्र, एका रात्रीत या गोष्टी होत नाही. याबाबत सर्वांना विचारात घेणे गरजेचे असते. गेल्या वेळी रूग्णालयाला जेव्हा आग लागली होती. तेव्हा यासंदर्भात मागणी केली होती. यासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलने झाले आहे. ती फाईल पूर्ण व्हायला तसेच त्याची पॉलिसी बनवून अंमलबजावणी करायला आणखी दोन ते तीन महिने लागतील, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
उरवडे येथील कंपनीला त्यांनी भेट देत पाहणी केली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सुळे म्हणाल्या, उद्योग असो दवाखाने असो किंवा नागरी जागा असो त्या ठिकाणी आगीपासून सुरक्षेच्या दृष्टीने स्वतंत्र फोर्स, तसेच पायाभूत सुविधा असाव्या असे माझे मत आहे. यासंदर्भात आज जे कायदे आहे त्यांचे आणखी बळकटीकरण होणे गरजेचे आहे. अस्तित्वात असलेल्या कायद्याची अंमलबजावणी पाहिजे त्याप्रमाणात होत नाही आहे. सातत्याने घटना घटल्यावरच यावर चर्चा करण्यापेक्षा ठोस पावले उचलण्याची गरज आहे. यामुळे यासंदर्भात मी जी पॉलिसी बनवण्याची मागणी करत आहे ती जर झाली तर बरेच प्रश्न सुटतील, असे वाटत असल्याचे सुळे म्हणाल्या.
फोटो आहे