लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : हुंडा मागितला जात असल्याने मध्यंतरी लातूरमध्ये युवतीने आत्महत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर परिवर्तनशील युवक युवतींनी हुंडा देणार नाही आणि घेऊ देणार नाही, अशी शपथ घेऊन हमीपत्रावर स्वेच्छेने लिहून दिले. या उपक्रमाने महात्मा फुले स्मारकाच्या समता भूमीवर हुंडाविरोधी चळवळ सुरू झाली.विविध संघटनांमध्ये कार्य करणारे ३० युवक-युवती या मोहिमेत सहभागी झाले होते. रविवारी सकाळी एकत्र जमलेल्या या तरुणांनी महात्मा फुले यांच्या पुतळ्याला साक्षी ठेवून शपथ घेतली. हुंडा घेणार नाही, घेऊ देणार नाही, हुंडा घेतल्यास १९६१ च्या कायद्यानुसार कारवाई करावी, असा मजकूर असलेले हमीपत्र स्टँपपेपरवर लिहून दिले. या चळवळीचे संयोजक सचिन आशा सुभाष आणि कुलदीप आंबेकर म्हणाले, हुंडा या जाचक रुढीची अनावश्यकता समजावून घेण्यासाठी पुण्यात तरुणांची हुंडा रवंथ परिषद जूनमध्ये पुण्यात आयोजिली जाणार आहे. महाविद्यालयांमध्ये हुंडाविरोधी मोहिम राबविली जाणार आहे. तसेच जुलैमध्ये पुणे ते लातूर दरम्यान गावोगावी जाऊन कीर्तन, प्रवचन, भाषण यांच्यामाध्यमातून परिवर्तन यात्रा काढण्यात येईल. यात्रेचा समारोप शीतल वायाळ या आत्महत्याग्रस्त युवतीच्या गावामध्ये केला जाईल.
हुंडाविरोधी चळवळीस युवकांचा पुढाकार
By admin | Updated: May 9, 2017 03:46 IST