लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) व डेक्कन जिमखान्यातर्फे आणि पीएमडीटीएच्या संलग्नतेने आयोजित पंचीवस हजार डॉलर पारितोषिक रकमेच्या केपीआयटी-एमएसएलटीए आयटीएफ महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम फेरीत दुहेरीत भारताच्या ऋतूजा भोसले हिने ब्रिटनच्या इमेली वेबली-स्मिथच्या साथीत भारताच्या रिया भाटिया व रोमानियाच्या मिरीयम बियांका बुलगारु या जोडीचा पराभव केला.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत दुहेरीच्या अंतिम फेरीचा सामना एक तास दहा मिनिटे चालला. सामन्यात पहिल्या सेटमध्ये अव्वल मानांकित ऋतूजा व इमेली यांनी आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत भाटिया व बुलगारु यांची सहाव्या गेममध्ये गेममध्ये सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये ऋतूजा व इमेली यांनी भाटिया व बुलगारु यांची पाचव्या गेममध्ये सर्व्हिस भेदली.
पुढच्याच गेममध्ये भाटिया व बुलगारु यांनी ऋतूजा व इमेलीची सर्व्हिस ब्रेक केली. सामन्यात ५-५ अशी स्थिती असताना अकराव्या गेममध्ये ऋतूजा व इमेली यांनी भाटिया व बुलगारु यांची सर्व्हिस भेदली व स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट ७-५ असा जिंकून विजेतेपद पटकावले. गेल्यावर्षी फेब्रुवारीत ऋतुजा व इमेली या जोडीने जोधपूर येथे अशीच स्पर्धा जिंकली होती. या विजेतेपदाबरोबरच ऋतुजाने दुहेरीच्या क्रमवारीत अव्वल दोनशे खेळाडूंमध्ये स्थान पटकावले आहे.
स्पर्धेतील दुहेरी गटातील विजेत्या जोडीला एक लाख पाच हजार रुपयांचे बक्षीस व ५० डब्लूटीए गुण, तर उपविजेत्या जोडीला बावन्न हजार रुपये व ३० डब्लूटीए गुण देण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र देशमुख, केपीआयटी टेक्नॉलॉजी लिमिटेडचे सहसंस्थापक व पीएमडीटीएचे अध्यक्ष किशोर पाटील, माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर, डेक्कन जिमखानाचे मानद सचिव विश्वास लोकरे यांच्या हस्ते करण्यात आले. डेक्कन जिमखानाच्या टेनिस विभागाचे सचिव व स्पर्धेचे सहसंचालक आश्विन गिरमे, आयटीएफ सुपरवायझर शितल अय्यर आदी यावेळी उपस्थित होते.
दुहेरी गट : अंतिम फेरी :
ऋतुजा भोसले-इमिली वेबली स्मिथ (१) वि.वि. रिया भाटिया-मिरीयम बियांका बुलगारु, रुमानिया (२) ६-२, ७-५.