कळस : जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून इंदापूर तालुक्याला पाणीदार बनविण्यात यश आले आहे. गत दोन वर्षांमध्ये झालेल्या जलसंधारणाच्या कामांच्या माध्यमातून सुमारे ३० टीसीएम एवढा पाणीसाठा करण्यात यश आले आहे. त्यामुळे आगामी काळात उन्हाळ्यातील शेतकऱ्यांची पाण्याची गरज भागण्यास मदत होणार आहे. इंदापूर तालुक्यामध्ये गतवर्षी सुमारे १५ गावांमध्ये ३३३ जलसंधारणाची कामे पूर्ण करण्यात आली आहेत, तर यंदा या कामांचा आराखडा वाढविण्यात आला असून, तालुक्यात सुमारे ६०० जलसंधारणाची कामे करण्यात येत आहेत. जलसंधारणाची ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी कृषी विभाग, जलसंधारण, छोटे पाटबंधारे विभाग, वनविभाग व भूजल सर्वेक्षण विभागाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. जलसंधारणाच्या या कामांचा थेट फायदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर होणार आहे. पावसाळ्यानंतर काही दिवसांत कोरड्या पडणाऱ्या विहिरीचीही पाणीपातळी यंदा उन्हाळ्यात काहीकाळ टिकून राहण्याची शक्यता आहे. गावातील नाल्यांचे खोलीकरण झाल्याने त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा झाला आहे. परिणामी अनेकांच्या विहिरी पाण्याने डबाबल्या आहेत. अनेक ठिकाणी या कामांमुळे नागरिकांच्या रस्त्याचा प्रश्नही मार्गी लागला आहे. नाल्याचे खोलीकरण करताना निघालेल्या मुरूम मातीचा नाल्यालगत भराव करण्यात आल्याने नागरिकांना भराव्यावरून चांगला रस्ता मिळाला आहे.
जलयुक्त शिवारमुळे इंदापूर बनले पाणीदार!
By admin | Updated: February 11, 2017 02:42 IST