पुणे : नोटाबंदी, वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी यामुळे काही प्रमाणात विस्कळीत झालेल्या सराफी बाजाराला मागणीची झळाली येऊ लागली आहे. नवरात्रीनिमित्त सोने आणि चांदीच्या खरेदीसाठी ग्राहकांची वर्दळ सुरू झाली असून, दसरा आणि दिवाळीपर्यंत त्यात आणखी वाढ होईल, असे सराफ व्यावसायिकांनी सांगितले.वास्तूपाल रांका म्हणाले, उत्सवामुळे काही प्रमाणात लग्नासाठी दागिने खरेदी करण्यास सुरुवात झाली आहे. गेला काही काळ सराफी बाजारात असलेली मरगळ निघून गेली आहे. मंगळसूत्र, टेम्पल ज्वेलरी, सोनसाखळी खरेदीकडे नागरिकांचा कल आहे. मंगळसूत्रातील पेंडंट हिºयाचे बनविण्याकडे देखील कल वाढत आहे. चांदीची देवाची मूर्ती, निरंजन, लक्ष्मीची प्रतिमा यांना चांगली मागणी आहे. उत्सवकाळात भेट देण्यासाठी देखील या वस्तूंची खरेदी मोठ्या प्रमाणावर होते.पवन अष्टेकर म्हणाले,‘सणासुदीमुळे वाढलेली मागणी आणि भावात झालेली घट यामुळे बाजारात चांगले वातावरण आहे. नवरात्रीच्या आणि पुढे दसरा-दिवाळीमध्ये बाजारात आणखी तेजी येण्याची शक्यता आहे. सध्या टेम्पल ज्वेलरी, अॅँटीक यांना विशेष मागणी आहे.दसरा आणि दिवाळीच्या मुहूर्तावर सोने खरेदी करण्याचा ग्राहकांचा कल असतो. त्यामुळे आत्तापासूनच मागणी नोंदविली जाऊ लागली आहे.पारंपरिक दागिन्यांबरोबरच नव्या डिझाईनलाही मागणी वाढत आहे. त्यामुळे पुण्यातील सराफांच्या दुकानात मोठी गर्दी होऊ लागली आहे. दिवाळीनंतर येणाºया लग्नसराईपर्यंत तेजी टिकून राहिल, असा व्यावसायिकांचा अंदाजआहे.सोन्यावर तीन टक्के जीएसटी आहे. मात्र, जीएसटीबाबत झालेल्या जागृतीमुळे याबाबत ग्राहकांची तक्रार नाही. उलट आता पारदर्शक व्यवहार होऊ शकतो, असे ग्राहक म्हणत असल्याचे सराफ व्यावसायिक सांगत आहेत.देवीची मूर्ती, चांदीचे साहित्य अशा साहित्यांना या काळात विशेष मागणी असते. दसºयाला सोन्याच्या मागणीत अधिक वाढ होते. दागिने, वेढणी, आपट्याची सोन्याची पाने या दिवशी खरेदी केली जातात. लग्नसराईसाठी दागिने खरेदी करण्यासाठी देखील या दिवसाची निवड केली जाते. त्यानंतर पुन्हा दिवाळीची खरेदी सुरू होते. वस्तू आणि सेवा कराची नागरिकांना सवय होत आहे. अंमलबजावणीच्या अडचणीचे पहिले काही दिवस गेले असल्याने, त्याचा खरेदीवर काही प्रतिकूल परिणाम होताना दिसत नाही. सोन्याचा प्रतितोळा भाव २९ हजार ८०० रुपये असून, चांदीचा प्रतिकिलो दर ३९ हजार ५०० आहे.- अभय गाडगीळ, सराफ व्यावसायिक
नवरात्रीमुळे सोन्याच्या मागणीत वाढ, दसरा-दिवाळीला तेजीची शक्यता, सराफी बाजारपेठ ग्राहकांनी गजबजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 04:44 IST