पुणे : महापालिकेच्या मुख्य इमारतीत अतिक्रमण विभागासाठी देण्यात आलेली जागा सोडण्यास नकार देणाऱ्या पाणीपुरवठा विभागाच्या खोल्यांना सोमवारी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने चक्क टाळेच ठोकले. त्यामुळे बसण्याच्या जागांवरून महापालिकेच्या विविध विभागांमध्ये सुरू असलेला वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी महापालिका आयुक्तांनीही मध्यस्थी करण्यास नकार दिल्याने पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी चक्क हे टाळे तोडून कामकाज केले. जवळपास चार ते पाच तास हा गोंधळ सुरू होता. त्यामुळे अनेकांचे मनोरंजन झाले तर, पाणीपुरवठा विभागात कामासाठी आलेल्या नागरिकांना हेलपाटा घ्यावा लागला.महापालिकेच्या काही विभागप्रमुखांची कार्यालये शहरात इतरत्र आहेत. त्यामुळे या विभागप्रमुखांना अनेकदा बैठका तसेच इतर कामांसाठी महापालिकेत यावे लागते. यात अतिक्रमण विभाग, वाहतूक नियोजन विभाग यांसारख्या काही प्रमुख विभागांचा समावेश आहे. त्यामुळे अधिकारी तसेच अधिकाऱ्यांच्या सहीसाठी नागरिकांचे होणारे हेलपाटे कमी करण्यासाठी सर्व विभागप्रमुखांची बसण्याची सोय मुख्य इमारतीमध्ये करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले होते.> महापालिकेतील असलेल्या खोल्यांची संख्या प्रत्येक विभागासाठी निश्चित करून देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार, पहिल्या मजल्यावरील तीन खोल्या अतिक्रमण विभागास देण्यात आल्या होत्या. या खोल्यांमध्ये पाणी पुरवठा विभागाच्या मीटर बिल तसेच वेतनाची बिले आणि स्वारगेट, चतु:शृृंगी तसेच लष्कर जलकेंद्राचे काम चालते. या ठिकाणी जवळपास ४0 ते ५0 कर्मचारी आहेत.> या ठिकाणचे कर्मचारी सकाळी दहा वाजता कामावर आले असता, त्यांना या खोल्यांना कुलूप लावलेले व दारावर अतिक्रमण विभागाची नोटीस दिसून आली. त्यामुळे चक्रावलेल्या या कर्मचाऱ्यांनी आपल्या विभाग प्रमुखांसह थेट महापालिका आयुक्तांचे कार्यलय गाठत हा प्रकार सांगितला. या वेळी आयुक्त कुणाल कुमार यांनी ही कुलपे काढण्याचे तोंडी आदेश दिले.
पाणीपुरवठा विभागाला ‘अतिक्रमण’चे टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2015 04:57 IST