बेकायदेशीर विक्रीसाठी १७०० जीवांची वाहतूक; कोट्यवधींचा होतो व्यवहार
श्रीकिशन काळे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : चेन्नईवरून मुंबईला बेकायदेशीरपणे घेऊन जाणारे १२०९ इगुना सरडे, २३० बेट्टा फिश आणि आफ्रिकी प्रजातीचे २७९ कासवे पोलिसांनी ताब्यात घेतली. हा विषय सीमा शुल्क विभागाचा असल्याने सध्या हा विषय त्यांच्याकडे आहे. मात्र या तिन्ही जीवांना घरात ‘पेट’ म्हणून ठेवण्यासाठी खूप मागणी असल्याने त्याची तस्करी होत आहे. हजारो रुपये मोजून हे प्राणी घरात आणण्याचे ‘फॅड’ शहरांमध्ये वाढीस लागले आहे.
कुत्रा, मांजर या पारंपरिक पाळीव प्राण्यांपेक्षा वेगळे म्हणून इगुना सरडे, कासवे, बेट्टा फिश या ‘एक्झॉटिक’ प्राण्यांना मागणी आहे. इगुना सरडा हा आफ्रिकी प्राणी तिकडेही ‘पेट’ म्हणून लोकप्रिय आहे. भारतातही त्याचे आकर्षण वाढले आहे. या सरड्यांचे खाद्य झाडांची पाने असतात त्यामुळे त्यांना घरात ठेवणे अवघड जात नाही.
मुंबईला बेकायदेशीरमार्गे निघालेल्या या जीवांना सध्या बावधन येथील ‘रेस्क्यू सेंटर’मध्ये ठेवले आहे. या केंद्राच्या संचालक नेहा पंचमिया म्हणाल्या, “एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्राण्यांची तस्करी पहिल्यांदाच पाहिली. हे तिन्ही जीव ‘पेट’ आहेत. एक इगुना सरडा ५ हजार ते १ लाख रुपयांपर्यंत विकला जातो. मुंबईत या प्राण्यांचे मोठे मार्केट आहे. या सरड्यांच्या देखभालीसाठीही फार मेहनत घ्यावी लागत नाही.”
चौकट
असाा असतो इगुना
-२० वर्षांपर्यंतचे आयुष्यात ७ फुटांपर्यंत लांब वाढतो.
-फळं, हिरवी पान, कॅल्शिअम असलेले पदार्थ खातो.
-मुख्य म्हणजे चावत नाही.
-लहान असताना हिरव्या रंगाचे असतात, मोठे झाल्यावर अंगावर काटे दिसतात.
चौकट
“इगुना सरडे, आफ्रिकी कासव, बेट्टा मासा या परदेशी ‘पेट्स’ना भारतात लोकप्रियता मिळत आहे. या प्राण्यांची बेकायदेशीर विक्री खूप होते. ‘पेट शॉप्स’ तसेच ‘सोशल साइट्स’वरून सहजरीत्या या प्राण्यांच्या विक्रीचे व्यवहार केले जातात. त्यांची जाहिरात केली जाते.”
- प्रतीक मोरे, वन्यजीव संशोधक
चौकट
“सर्व प्राणी केंद्रात देखरेखीखाली आहेत. हे महागडे परदेशी प्राणी ‘पेट’ म्हणून लोकप्रिय असले तरी आपल्या जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून हे प्राणी धोकादायक आहेत.”
- नेहा पंचमिया, संचालक, रेस्क्यू सेंटर, बावधन