पुणे : देशात आदर्श ठरलेल्या माथाडी कायद्याने हमालासारख्या कष्टक-यांचे जीवन आमुलाग्र बदलले. भारतात लागू असलेल्या या कायद्याची आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेपासून ते विद्यमान केंद्र सरकारपर्यंत सर्वांनी प्रशंसा केली आहे. परंतु , आज या कायद्याचा जन्म झाला त्याच महाराष्ट्रात राज्य सरकार नतद्रष्टपणा दाखवत कायद्याला धक्का लावण्याचे धोरण स्विकारण्याच्या प्रयत्नात आहे. देशात आदर्श असलेल्या व संघर्ष करून मिळवलेला माथाडी कायद्याला हात लावाल प्राणांतिक लढाई छेडली जाईल,असा इशारा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.बाबा आढाव यांनी येथे दिला. माथाडी कायद्याची सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल यानिमित्त डॉ. बाबा आढाव यांच्या अध्यक्षतेखाली माथाडी मंडळातील ज्येष्ठ महिला- पुरुष कामगारांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष तथा सहायक कामगार आयुक्त चंद्रकांत राऊत, ज्येष्ठ व्यापारी नेते वालचंद संचेती, पुणे मर्चंट चेंबरचे अध्यक्ष पोपट ओसवाल, आडत असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ, पुणे जिल्हा गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राम कदम उपस्थित होते. पुणे माथाडी मंडळाच्या दारामधे जागतिक पर्यावरण दिवसच्या निमित्ताने वृक्षारोपण करण्यात आलॆ. आढाव म्हणाले, आपल्या भाषणात माथाडी कायद्याची सुवर्णमहोत्सवाकडे वाटचाल करत असताना देशभर हा कायदा कसा अंमलात आणण्यात येईल याबाबत केंद्र सरकारच्या हालचाली सुरु आहे. परंतु मुठभर भांडवलदारांसाठी आपले राज्य सरकार हा कायदाच मोडीत काढण्याचा प्रयत्न करत आहे, अशी खंत यावेळी व्यक्त केली. त्यामुळे सरकारविरोधात ३ जुलै रोजी महाराष्ट्रभर एक दिवसाच्या माथाडी कामगारांचा लाक्षणिक धरणे आंदोलन राज्यातील प्रत्येक माथाडी मंडळाच्या कार्यालयासमोर करण्यात येणार आहे. त्याचदिवशी महाराष्ट्र प्रदेश कृतीसमितीचे सर्व प्रमुख नेते पुणे येथील माथाडी मंडळाच्या दारात धरणे आंदोलनात सहभागी होणार आहेत. यातुनही जर सरकारने निर्णय बदलला नाही तर आंदोलन अधिक मोठ्या प्रमाणावर तीव्र स्वरुपाचे करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. नवनाथ बिनवडे यांनी प्रास्ताविक तर संतोष नांगरे यांनी आभार मानले.
माथाडी कायद्यास नख लावाल तर...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 21:38 IST
महाराष्ट्रात राज्य सरकार नतद्रष्टपणा दाखवत माथाडी कायद्याला धक्का लावण्याचे धोरण स्विकारण्याच्या प्रयत्नात आहे, असेही ते म्हणाले.
माथाडी कायद्यास नख लावाल तर...
ठळक मुद्देमाथाडी कायद्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षास प्रारंभ सरकारविरोधात ३ जुलै रोजी महाराष्ट्रभर एक दिवसाच्या माथाडी कामगारांचा लाक्षणिक धरणे आंदोलन