शिरूर : आयकर विभागाला अर्ज केल्याच्या संशायातून एका व्यापाऱ्यावर पिस्तूल रोखल्याची घटना घडली. यावेळी संशयितांनी हवेत गोळीबार केला. शिरूर पोलिसांनी आठ तासांत संशयिताला जेरबंद केले. कृष्णा वैभव जोशी, (रा. सरदार पेठ, शिरूर, ता. शिरूर) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. या प्रकरणी महेश मोतीलाल बोरा यांनी तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी (दि. २०) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास शिरूर शहरातील सरदार चौक येथे ही घटना घडली. बोरा हे त्यांच्या सरदार पेठ येथील रिवटी प्रोव्हिजन स्टोअर्स समोर उभे असताना संशयित कृष्णा जोशी तेथे आला. बोरा यांनी त्याचेविरुद्ध इन्कम टॅक्सला सुमारे चार वर्षांपूर्वी अर्ज केल्याचा गैरसमज झाल्याने त्याने दारू पिऊन बोरा यांना शिवीगाळ केली.तसेच वाद घालत त्याचे जर्किंगमधील एक पिस्तूल बाहेर काढून फिर्यादींना जिवे ठार मारण्याचे उद्देशाने पिस्तूल फिर्यादींचे छातीवर रोखून "मी तुला आज जिवंत सोडणार नाही" अशी धमकी दिली. पिस्तूलचा खटका दाबत असताना फिर्यादींनी त्याचा हात बाजूला ढकलला. यावेळी त्यातून एक तेथेच हवेत सुटली, तर झटापटीत एक गोळी खाली रोडवर पडली. लोक गोळा झाल्याचे पाहून बोरा यांना जिवे ठार मारण्याची धमकी देऊन कृष्णा जोशी हा तेथून पळून गेला. या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत पथकाला कार्यरत केले. या गुन्ह्यातील आरोपी कृष्णा वैभव जोशी हा अहिल्यानगर बसस्थानकावरून जोधपूर, राजस्थान येथे जाणार असल्याची खबर मिळाल्यानांतर तपास पथकांनी अहिल्यानगर बसस्थानकावर सापळा लावून जोशी त्या ठिकाणी येताच त्यास शिताफीने ताब्यात घेतले. गुन्हा घडल्यापासुन अवघ्या आठ तासांच्या आत त्यास जेरबंद करण्यात आले आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. शिरूर पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेले गावठी बनावटीचे एक पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त केले आहे.