पुणे : महापालिका प्रशासनान हिरकणी कक्षाचे काम सुरू केले, मात्र शहरातील २२ पाळणाघरांची योजना बासनात गुंडाळून ठेवली आहे. महापालिकेतील हिरकणी कक्ष आणि पाळणाघराचा प्रश्न ‘लोकमत’ने मांडला होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनामुळ हिरकणी कक्षाचे काम सुरू झाले, मात्र पाळणाघरे दुर्लक्षितच आहेत. शिवाजीनगर येथे पालिकेचे एक पाळणाघर सध्या सुरू आहे. तिथे एक परिचारिका, सुरक्षारक्षक तसेच शिपाई असे कर्मचारीही नियुक्त करण्यात आले आहेत. महापालिकेच्या वापरात नसलेल्या इमारतींची दुरूस्ती करून तेथे अशी पाळणाघर सुरू करण्याचे ठरले होते. नागर वस्ती विकास विभागाला त्यासाठी शहरात अशा इमारती कुठे आहेत त्याचे सर्वेक्षण करण्यास सांगण्यात आले होते. मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. पालिकेची ही योजना प्रशासनाने गुंडाळूनच ठेवली असल्याचे दिसते आहे. शहरात अनेक ठिकाणी खासगी पाळणाघरे आहेत, मात्र त्यांची शुल्क आकारणी सर्वसामान्य नोकरदार, घरेलू कामगार महिलांना परवडत नाही. त्यासाठी पालिकेने पुढाकाराची गरज आहे.
हिरकणी कक्ष मार्गी, पाळणाघरे दुर्लक्षितच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2016 03:45 IST