पुणे : निवडणुकीमध्ये होत असलेला कोटयावधी रूपयांचा चुराडा, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा राजकारणात शिरकाव, घराणेशाही आदी भ्रष्ट प्रवृत्तींना दूर करण्यासाठी लोकायत संस्था व सोशालिस्ट पार्टीच्या माध्यमातून काही उच्च शिक्षित तरूण-तरूणी राजकारणात उतरले आहेत. लोकांच्या मनात राजकारण्यांविषयी चीड निर्माण झाली असल्याने त्याला चांगले पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी यामध्ये उडी घेतली आहे.सोशालिस्ट पार्टी व लोकायत संस्थेच्यावतीने प्रभाग १४ मध्ये ३ उमेदवार रिंगणात उतरविण्यात आले आहेत. या उमेदवारांच्या प्रचारासाठी उच्च शिक्षित कार्यकर्त्यांचे जाळे कार्यरत आहे. आपले शिक्षण, नोकरी सांभाळून ते प्रचारात उतरले आहेत. संदीप सावारकर या तरूणाने एमई केले असून तो आयआयटी पवई येथे पीएचडी करतो आहे. तो व आयआयटीमधील मित्र या प्रचारात कार्यरत आहेत. त्याचबरोबर सीओईपी महाविद्यालयात शिकत असलेले १० ते १२ तरूण-तरूणीही त्यांचे शिक्षण सांभाळून प्रचारात मदत करीत आहेत.निवडणुकीची व्याख्याच सध्या बदलून गेलेली आहे. उमेदवारांकडून लाखो-करोडो रूपये खर्च केले जात आहेत. प्रचारासाठी भाडोत्री लोक आणण्यापासून ते ५ हजार रूपये देऊन मत विकत घेण्यापर्यंत मोठयाप्रमाणात पैसा खर्च केला जात आहे. त्यामुळे असे उमेदवार निवडून आल्यानंतर सर्वसामान्य लोकांचे, लोकांच्या जगण्याचे प्रश्न सोडविले जात नाहीत.
पर्यायी राजकारणासाठी उच्च शिक्षित राजकारणात
By admin | Updated: February 14, 2017 02:22 IST