नारायणगाव : ठाणे जिल्ह्णातील पालघर येथील आदिवासी मुलांना चांगले शिक्षण मिळावे, या हेतूने न्यूझीलंडमध्ये समाजसेवा करणाऱ्या दोन अनिवासी भारतीय परदेशी पाहुण्यांनी आर्थिक मदत गोळा करण्यासाठी मुंबई ते पुणे व नाशिक ते पालघर असा ५७० किलोमीटर पायी प्रवास सुरू केला आहे. दोन परदेशी मित्रांसह तीन जणांचे नारायणगाव येथे स्वागत करण्यात आले.
महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्णातील पालघरमधील आदिवासी भागातील शाळांची निवड करून तेथील आदिवासी मुलांना नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आधुनिक शिक्षणप्रणाली व दर्जेदार प्रयोगशाळा, विविध सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने चॅरिटी वॉक (दानयात्रा) संकल्पनेतून न्यूझीलंडमधील दान यात्रेसाठी प्रसिद्ध असणारे माइक बटलर (वय ६७) यांच्याबरोबर न्यूझीलंड येथील सॉफ्टवेअर कंपनीत आयटी अभियंता म्हणून नोकरीला असलेले अनिवासी भारतीय पंकज आंबेवणे यांनी कंपनीतील सहकारी डेरिल पर्सी (वय ५८) यांच्यासमवेत व परदेशी मित्रांच्या मदतीने मुंबई - लोणावळा - पुणे - चाकण - राजगुरुनगर - नारायणगाव - संगमनेर- शिर्डी व नाशिकवरून - वाडा, जिल्हा पालघर अशी ५७० किमीची दानयात्रा सुरू केली आहे. नारायणगाव येथे ही यात्रा आल्यानंतर अनिकेत अशोक पाटे, स्वप्निल भोंडवे, कविता पाटे, सौ. रागिणी पाटे यांनी त्यांचे स्वागत केले. पाहुण्यांनी ग्रामदैवत मुक्ताबाईदेवीचे दर्शन घेऊन नारायणगावची माहिती घेतली. यावेळी परदेशी पाहुणे माइक बटलर व डेरिल परसी, पंकज आंबवणे यांनी सांगितले, की ‘न्यूझीलंडमध्ये नोकरी करून सामाजिक भावनेतून विविध कार्यक्रमांचे आयोजन करून आम्ही मदत निधी गोळा करतो. त्यामध्ये चॅरिटी वॉक (दान यात्रा) ही संकल्पना जास्त राबविली जाते. आम्हाला या कार्यातून समाधान मिळते.’
(न्यूझीलंडमध्ये समाजसेवा करणाऱ्या दोन अनिवासी भारतीयांसह परदेशी तीन पाहुण्यांनी ५७० किमीची दानयात्रा सुरू केली आहे. या दौºयानिमित्त नारायणगाव येथे स्वागत करण्यात आले. )