पुणे : कोचिंग क्षेत्रातील विविध मुद्दे व समस्यांचे निराकरण करण्यासाठी कोचिंग फेडरेशन ऑफ इंडिया तर्फे महाराष्ट्रातील सहा संस्थांसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. यामध्ये प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन (पीटीए)- महाराष्ट्र, महाराष्ट्र क्लास ओनर्स असोसिएशन (एमसीओए) मुंबई, कोचिंग क्लास प्रोप्रायटर असोसिएशन (सीसीपीए) ठाणे, असोसिएशन ऑफ कोचिंग इन्स्टिट्यूटस (एसीआय) नागपूर, असोसिएशन ऑफ कोचिंग क्लास ओनर्स अॅण्ड मेंटर्स (एसीसीओएम) मुंबई आणि कोचिंग क्लासेस असोसिएशन (सीसीए) औरंगाबाद या संघटनांचा समावेश आहे.
भारताच्या कोचिंग क्षेत्रातील कार्यरत व्यक्तींच्या कल्याणाकरिता सर्व संघटनांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या. याबाबतच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पुण्यात बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी कोचिंग फेडरेशन ऑफ इंडिया, नवी दिल्लीचे सरचिटणीस अलोक दीक्षित, पीटीए अध्यक्ष विजयराव पवार, पीटीएचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण ठाकूर, माजी सरचिटणीस डॉ. पी. कुलकर्णी आणि माजी कार्यकारी अध्यक्ष रवी शितोळे आदी उपस्थित होते.
कोरोनामुळे कोचिंग क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने एक कोटीहून अधिक शिक्षकांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. देशात ७.२५ लाखांपेक्षा अधिक नोंदणीकृत कोचिंग संस्था आहेत. ५० लाखांहून अधिक कोचिंग शिक्षक व त्यांच्याशी संबंधित अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यातील ५ कोटीहून अधिक भारतीय नागरिक हे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे या क्षेत्रावर अवलंबून आहेत. त्यामुळे क्लास चालक व विद्यार्थ्यांसाठी बिगरव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.