पुणे : येवलेवाडी येथील दांडेकर नगरमधील एका गोदामाला आज सकाळी भीषण आग लागली असून त्यात गोदामातील तेल व खाद्यपदार्थांमुळे ही आग मोठ्या प्रमाणावर भडकली आहे. त्यात गोदामाच्या शेजारीच लावलेले ट्रक, मोटार, टेम्पोही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहेत. हडपसरजवळील येवलेवाडी येथील दांडेकरनगरमधील एका गोदामाला आज सकाळी अचानक आग लागली. अग्निशामक दलाला याची माहिती सकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी समजली. त्यानंतर तातडीने अग्निशामक दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. या गोदामात तेल व खाद्य पदार्थ असल्याने आग मोठ्या प्रमाणावर भडकली. त्यामुळे गोदामाशेजारी पार्क केलेला ट्रक पेटला असून, त्याच्या शेजारची एका कारलाही आग लागली आहे. आग इतकी भीषण व मोठी असून एक तासानंतरही आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशामक दलाला यश आले नव्हते. अग्निशामक दलाच्या १२ गाड्या, ३ ट्रँकर आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.
पुण्यातील येवलेवाडीत गोदामांना भीषण आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 08:33 IST