पुणे : घाऊक बाजारात आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढूनही भाव सर्वसामान्यांच्या आवाक्यात आलेले नाहीत. तसेच मागणीच्या तुलनेत तयार आंब्याचा तुटवडा असल्याने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आंबा खरेदी करणे सर्वसामान्यांना परवडणार नाही, असे चित्र आहे.गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात आंब्याची खरेदी होते. अनेकजण या दिवसापासूनच आंब्याची चव चाखायला सुरूवात करतात. त्यामुळे बाजारात दरवर्षी आवकही मोठी होते. यंदा आंब्यासाठी पोषक वातावरण असल्याने उत्पादन मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हंगामाची आवकही तुलनेने लवकर झाली. त्यामुळे गुढीपाडव्यापर्यंत भाव आवाक्यात येण्याची शक्यता होती. मात्र बाजारात तयार मालाचा मोठ्या प्रमाणात तुटवडा असल्याने अनेकांना आंब्याची खरेदी करता येणार नसल्याचे चित्र बाजारात आहे. रविवारी मार्केटयार्डातील फळबाजारात रत्नागिरी हापूसची सुमारे ४ ते हजार पेट्यांची आवक झाली. मागणीमुळे भावात वाढ झाल्याने घाऊक बाजारातील डझनाचे भाव ४०० ते ८००रुपयापर्यंत गेले होते. तर किरकोळ बाजारातील डझनाचे भाव ६०० ते १००० रुपये आहेत. बहुतांश व्यापाऱ्यांनी पाडव्यासाठी माल तयार करुन ठेवला होता. मात्र मागणीत प्रचंड वाढ झाल्याने सकाळीच बाजारातील तयार माल संपला. त्यालाही अधिकचा भाव मिळाला. मागील वर्षी या काळात तयार माल मोठ्या प्रमाणात उपलब्ध होता. त्यामुळे तुलनेत भाव कमी होते. (प्रतिनिधी)
हापूस ग्राहकांच्या आवाक्याबाहेरच
By admin | Updated: March 27, 2017 03:03 IST