वाकड : एकीकडे वृक्षसंवर्धनासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धनासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध शासकीय योजना उपक्रमांवर शासनाचे करोडो रुपये खर्च होत आहे. तर दुसरीकडे सामाजिक संस्थेच्या नावाखाली जांबे गावातील गायरानात हजारो वृक्षांची कत्तल केली जात आहे.जांबे (ता. मुळशी) गायरानात सामाजिक वनीकरण विभागाने केलेल्या मोठ्या वृक्षांची सकाळपासून कत्तली करण्यास सुरुवात झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. सरपंच अंकुश गायकवाड यांनी हा मनमानी कारभार असून, कुठलीही परवानगी न घेता वृक्षतोड केल्याचा आरोप केला आहे. मात्र, या वृक्षतोडीला तहसीलदारांनीच हिरवा कंदील दाखविल्याचे समोर येत असल्याने नागरिकांत संभ्रम आहे. गावातील सर्व्हे क्रमांक १७१मध्ये सुमारे ४० एकरांचे गायरान आहे. या जागेवर सामाजिक वनीकरण विभागाने काही वर्षांपूर्वी ग्लेरेसिया जातीच्या झाडांची लागवड केल्याने या जागेला जंगलाचे रूप आले आहे. तर ७ वर्षांपूर्वी यापैकी २० एकर क्षेत्राच्या सात बाऱ्यावर ग्राम उन्नत मंडळ या संस्थेचे नाव लागले. १० एकर कासेगाव एज्युकेशन सोसायटीच्या नावे आहे, तर उरलेली १० एकर जमीन ग्रामपंचायत जांबेच्या नावे आहे. गुरुवारी सकाळपासून मशिन कटरच्या साहाय्याने ही वृक्षतोड सुरू करण्यास सुरुवात झाली आहे. येथे २०-२५ फुटांचे असंख्य मोठे वृक्ष आहेत. याबाबत जांबेचे ग्रामसेवक सतीश कालेकर यांनी कर्मचाऱ्याला तेथे पाठवून याबाबत विचारपूस करण्यास सांगितले असता, येथील काही अधिकाऱ्यांनी मावळ-मुळशीचे प्रांत अधिकाऱ्याची परवानगी घेतली आहे. त्याची प्रत तलाठी यांना दिली असून, ग्रामपंचायत कार्यालयालादेखील देतो, असे सांगितले. कुठलाही पत्रव्यवहार अथवा परवानगी घेतली नसल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत तलाठी व सर्कल अधिकारी यांच्याशी संपर्क झाला नाही. (वार्ताहर)
अर्धा एकर परिसरातील झाडे तोडली
By admin | Updated: January 20, 2016 01:12 IST