पिंपरी : उद्योगामध्ये गुजरातला प्रथम स्थानावर नेण्याचा डाव असल्याने ‘महाराष्ट्र फस्ट’चे धोरण राज्यामध्ये बदलले आहे. त्यामुळेच ‘महाराष्ट्र नेक्स्ट’ची नीती सध्या नव्या सरकारने स्वीकारली आहे. गुजरातने टाकून दिलेले उद्योग राज्यात येत आहेत, अशी टीका करून कामगारांसाठी रस्त्यावर उतरून दोन हात करण्याची तयारी असल्याचे प्रतिपादन माजी राज्य उद्योगमंत्री आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघटनेचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी केले.भोसरी येथे रविवारी झालेल्या कामगार मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी आमदार महेश लांडगे, संघटनेचे सचिव गोविंदराव मोहिते, कामगार नेते यशवंत भोसले, नगरसेवक सुनील अहिर, बबनराव भेगडे, अण्णा शिरसेकर, निवृत्ती देसाई, रवींद्र घारे, विजय काळोखे, जिल्हाध्यक्ष संतोष बेंद्रे, संजय कदम, मंगलदास बांदल आदी उपस्थित होते. अहिर म्हणाले, ‘‘अच्छे दिन येतील म्हणून नागरिकांनी डोळे झाकून मतदान केले. मात्र, ६ महिन्यांतच हे सरकार उद्योगपतीचे असल्याचे दिसून आले. पहिल्यांदा कायदा केले कामगारविरोधी. आता भूसंपादन कायदा केला. गुजरातला पुढे नेण्यासाठी येथील उद्योग तिकडे वळवले जात आहेत. कामगार कायद्यातील बदल उद्योगपतींच्या बाजूने झुुकलेले असून, कामगार शोषणाची भूमिका घेतली आहे. ’’‘‘उद्योगमंत्री असताना अनेक चांगले निर्णय घेतले. मुंबईतील २५ हजार गिरणी कामगारांना घरे दिली. तशी येथील कामगारांसाठी घरे उपलब्ध करून देता येतील.’’कामगार नेते भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नरेंद्र फडणवीस यांच्या भांडवलशाही धोरणावर प्रखर टीका केली. (प्रतिनिधी)
गुजरातने टाकलेले उद्योग महाराष्ट्रात
By admin | Updated: March 16, 2015 04:25 IST