पुणे : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या एक वर्षाची कामगिरी बिलकुल समाधानकारक नाही. शहराचे अनेक प्रलंबित प्रश्न ‘जैसे थे’ आहेत. मागील पालकमंत्र्यांचा कामाचा झपाटा पाहता सध्याचे पालकमंत्री गिरीश बापट हे खूप कमी पडत असल्याचे वाटते. आयुक्त कुणाल कुमार यांच्या कामाचा वेगही दिसत नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रसच्या शहराध्यक्षा खासदार वंदना चव्हाण यांनी केली.शहराच्या नागरवस्ती योजना, सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्वच्छता, नदीसुधार योजना आदी विविध प्रश्नांबाबत वंदना चव्हाण यांनी आयुक्त कुणाल कुमार यांची भेट घेतली. त्याबाबतची माहिती त्यांनी चव्हाण यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. मोदी सरकारच्या एक वर्षाच्या कारभाराबाबत काय वाटते, असे त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले, की मोदी सरकारच्या कामगिरीवर मी बिल्कुल समाधानी नाही. पुणे शहराचे मेट्रोसह अनेक महत्त्वाचे प्रश्न रखडले आहेत. मागील पालकमंत्री अत्यंत कार्यक्षम होते, त्यांच्या तुलनेत सध्याचे पालकमंत्री खूपच कमी पडल्याचे दिसून येते. कचऱ्याच्या प्रश्नावर त्यांनी काहीच केलेले नाही.शहराच्या अनेक प्रश्नांबाबत प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करावा लागत आहे. प्रशासनाकडून खूपच संथपणे कामे केली जातात. आयुक्त कुणाल कुमार यांच्या कामाचा वेग दिसत नाही. त्यांची कामगिरी निराशाजनक आहे, असे चव्हाण यांनी सांगितले. सार्वजनिक स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता राखली जावी, यासाठी आयुक्तांकडे वारंवार पाठपुरावा करण्यात येत आहे. बांधकाम व्यावसायिकांनी सार्वजनिक स्वच्छतागृहे दत्तक घेऊन त्याची देखभाल करावी, यासाठी लवकरच महापालिकेकडून जाहिरात प्रकाशित केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
पालकमंत्री कमी पडले, आयुक्तही निष्क्रिय
By admin | Updated: May 26, 2015 01:22 IST