पुणे : जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना विचारल्याशिवाय महापालिकांना उद्घाटनाचे कार्यक्रम आयोजित करता येऊ नयेत; तसे झाल्यास संबंधितांकडून खर्च वसूल करावा, असे पत्र पालकमंत्री गिरीश बापट यांनी नगरविकास विभागाच्या सचिवांना पाठविले. यावरून पालकमंत्री व महापौर प्रशांत जगताप यांच्यातील वाद पुन्हा पेटला आहे. पालकमंत्री खुनशी राजकारण करून महापालिकेच्या कामात ढवळाढवळ करीत असल्याचा आरोप जगताप यांनी केला आहे.सीओईपी चौकातील उड्डाणपुलाच्या उद्घाटनाला महापालिकेच्या वतीने गिरीश बापट यांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, त्यांच्याकडे वेळ नसल्याने ते त्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. वेळ उपलब्ध नसताना उद्घाटनाचा कार्यक्रम घेतल्यामुळे बापट नाराज झाले. त्यांनी नगरविकास विभागच्या सचिव मनीषा म्हैसकर यांना याबाबत पत्र पाठविले आहे. शासनाच्या २७ जुलै २०१५च्या परिपत्रकाचा संदर्भ देऊन पालकमंत्री व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून त्यांना आमंत्रित केल्याशिवाय स्थानिक प्राधिकरणामार्फत कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत. असे कार्यक्रम आयोजित करण्यात आल्यास अशा कार्यक्रमांवर होणारा खर्च संयोजकांकडून वसूल करण्यात यावा. त्यामुळे अशा कार्यक्रमांवर होणाऱ्या खर्चाला प्रशासकीय मान्यता देऊ नये, अशा सक्त सूचना आयुक्तांना द्याव्यात, असे बापट यांनी पत्रात स्पष्ट केले आहे.गिरीश बापट यांनी नगरविकास विभागाला पाठविलेल्या या पत्रावर प्रशांत जगताप यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. जगताप म्हणाले, ‘‘कार्यक्रमाला कोणाला बोलवावे, याचे संपूर्ण अधिकार महापौरांना आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून उद्घाटनाचा धडाका लावला आहे. पालकमंत्री गेली दोन वर्षे सत्तेवर असतानाही शहरासाठी त्यांना एकही नवीन प्रकल्प आणता आलेला नाही. त्यामुळे त्यांनी भीतीतून नगरविकास विभागाला पत्र पाठविले आहे. ते राजकीय आणीबाणी लादण्याचा प्रयत्न करीत आहेत. स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये महापौरांचे नाव न टाकणे, शहराला एक दिवसाआड पाणी सोडणे अशा अनेक विषयांवर पालकमंत्री व महापौरांमध्ये सातत्याने वादाची ठिणगी पडत आहे. (प्रतिनिधी)निमंत्रण पत्रिकेत सर्व आमदारांची नावे महापालिकेच्या उद्घाटन व इतर कार्यक्रमांसाठी काढल्या जाणाऱ्या निमंत्रण पत्रिकेत केवळ पालकमंत्री व स्थानिक लोकप्रतिनिधींचे नाव टाकणे बंधनकारक आहे. मात्र, पुणे महापालिकेकडून शहरातील सर्व खासदार तसेच विधानसभा व विधान परिषदेच्या सर्व सदस्यांची नावे निमंत्रण पत्रिकेत टाकली जातात.प्रोटोकॉल पाळत नाहीत म्हणून लिहिलं पत्रमहापालिकेच्या कार्यक्रमात पालकमंत्री व मंत्री यांना बोलावणे हा राजशिष्टाचाराचा भाग आहे. महापालिकेकडून तो पाळला जात नाही. त्यामुळेच नगरविकास विभागाला मी पत्र लिहिले आहे. यामागील कोणत्या कार्यक्रमात त्यांनी हा बेजबाबदारपणा केला आहे त्याचीही माहिती मागविणार असल्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले. पाणी साठवण टाक्यांच्या कार्यक्रमाची पालिकेच्या माध्यमातून जाहिरात केली. त्यावर फक्त त्यांचे नेते अजित पवार यांचेच छायाचित्र होते. भाजपाच्या नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर ही पक्षाची जाहिरात होती व तिचे पैसे आम्ही भरणार, अशी भलामण केली. अजित पवार यांची तारीख व वेळ मिळाल्यावर ते पालकमंत्री म्हणून मला निमंत्रण देतात. मात्र, काही सांगायचेच नाही, बोलवायचेच नाही हा राजशिष्टाचाराचा भंग आहे व तो त्यांनी अनेकजा केला. यापूर्वीच्या जाहिरातींची माहिती मागवणार आहे, असे बापट म्हणाले.नगरसचिवांना मुंबईला बोलावले : पालकमंत्री गिरीश बापट यांनी नगरविकास विभागाला पाठविलेल्या पत्राच्या पार्श्वभूमीवर नगरसचिव सुनील पारखी व महापौरांच्या प्रोटोकॉल आॅफिसर योगिता भोसले यांना शुक्रवारी मुंबईला बोलावण्यात आले आहे. महापालिकेच्या कार्यक्रमांसंबंधी त्यांना विचारणा केली जाण्याची शक्यता आहे.
पालकमंत्री-महापौर वाद पुन्हा पेटला
By admin | Updated: October 28, 2016 04:43 IST