लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पेठांमध्ये मधील अरुंद रस्ते, शिवाय कडेला अस्ताव्यस्त पार्क केलेल्या गाड्या, त्यात वाहनांनी वाहणारे रस्ते अशी परिस्थिती असतानाही मागून जर सायरनचा आवाज आला, तर तातडीने वाहने एका बाजूला होतात. काही तातडीने आपल्या गाड्या बाजूला घेतात. चौकातील पोलिसाला मागून रुग्णवाहिका येताना दिसताच तो बाकी रस्त्यावरील गाड्या थांबून तातडीने रुग्णवाहिकांना रस्ता करुन देतो. वाहनांच्या गर्दीतून अत्यंत सफाईने मार्ग काढत रुग्णावाहिका चौकांमागून चौक पार करत हॉस्पिटलला पोहचते. सेव्हन लव्हज चौक ते के ई एम हॉस्पिटल दरम्यानचा रुग्णावाहिकेचा हा प्रवास अवघ्या काही मिनिटात पूर्ण होते. एरवी या रस्त्यावरुन जाण्यास इतर वाहनांना अर्धाहून अधिक तास लागला असता. त्यात काही तरुण रुग्णवाहिकेपुढे दुचाकीवरुन जाऊन इतर वाहनांना गाड्या बाजूला घेण्यास सांगत होते.
शहरात गर्दीच्या रस्त्यावरुन जाणाऱ्या रुग्णवाहिकांना खरंच वाहनचालक जागा देतात का याची चाचपणी ‘लोकमत’च्या वतीने करण्यात आली. त्यात रुग्णावाहिकांना प्रथम जाऊ देण्यात वाहनचालकांमध्ये चांगलीच जागरूकता झाली असल्याचे दिसून आले. रुग्णवाहिकेला प्रथम जाऊ देण्याबाबत अगदी मोठी अवजड वाहने, बसगाड्याही रुग्णवाहिकेसाठी रस्त्याच्या कडेला जाताना दिसून येते. त्याचवेळी काही वाहनचालक गर्दीतून आपल्यालाही पुढे जाण्यासाठी रस्ता मिळावा, यासाठी या रुग्णवाहिकेच्या मागोमाग जाण्यासाठी स्पर्धा करताना दिसून येतात. रुग्णवाहिकेमुळे आपणही वेळेआधी पुढे पोहचू असा त्यांचा हेतू असल्याचे दिसून येते. जूना बाजार येथील शाहीर अमर शेख चौक व तेथून मालधक्का चौक, बंडगार्डन पोलीस ठाण्यासमोरील चौकातून बहुसंख्य रुग्णवाहिकांना ससून रुग्णालयात जावे लागते. हा संपूर्ण रस्ता कायम वर्दळीचा असल्याने दोन्ही बाजूने नेहमीच वाहनांनी भरुन वाहत असतो. असे असतानाही या रस्त्यावरुन वाहतूक पोलीस व नागरिकही रुग्णवाहिकेला तातडीने रस्ता करुन देताना दिसतात.
.......
रुग्णवाहिका किंवा इतर कुठल्याही आत्पकालीन वाहनांचा रस्ता अडविल्यास १० हजार रुपयांचा दंड किंवा ३ महिन्यांचा कारावास किंवा दोन्ही अशा शिक्षेची तरतुद आहे. मात्र, गेल्या वर्षभरात असा दंड करण्याची वेळ शहरात आली नाही.
..........
रुग्णाला घेण्यासाठी घटनास्थळी जाताना सायरन वाजविता येत नाही, त्यामुळे प्रामुख्याने अडचण होते. रुग्णाला घेऊन रुग्णालयात जाताना सायरनचा आवाज ऐकल्यावर वाहनचालक बाजूला होतात. चौकातील वाहतूक पोलीसही रुग्णवाहिकेला मार्ग काढून घेण्यास मदत करतात. अनेकदा तरुण मुले वाहनांना बाजूला करण्यासाठी मदत करतात.
सचिन चिखले, रुग्णवाहिका चालक, के ई एम.
.........
कोठून कॉल आला, त्यानुसार त्याच भागातील रुग्णावाहिका आम्ही पाठवत असतो. गेली १५ वर्षे मी रुग्णवाहिका चालक म्हणून काम करत आहे. पूर्वीपेक्षा आता रस्त्यावरील वाहनांची संख्या वाढली असली तरी वाहनचालक रुग्णवाहिकेला जागा देण्यात अधिक तत्पर झाले आहेत. मागाहून रुग्णवाहिका येत असल्याचा सायरनचा आवाज ऐकून वाहनचालक बाजूला होताना दिसतात. काही वेळेला पुढे इतकी गर्दी झालेली असते की त्यांना बाजूला होण्यासाठी जागाच नसते. तरीही साधारणपणे वाहनचालक आता रुग्णवाहिकेला जागा करुन देताना दिसतात.
अब्बास इनामदार, (रुग्णवाहिका चालक, ससून हॉस्पिटल)