हणमंत पाटीलपिंपरी : पांढराशुभ्र सदरा...बलंदड शरीर...गळ्यात साडेतीन किलो सोन्याचे दागिने घालणाऱ्या खडकवासला येथील दिवंगत माजी आमदार रमेश वांजळे पहिले गोल्डनमॅन. त्यानंतर पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये ‘गोल्डन मॅन’ची क्रेझ सुरू झाली. आशिया खंडातील श्रीमंत नगरपालिका म्हणून ओळख असलेले शहर बदलत असले, तरी ‘गोल्डन मॅन’ची क्रेझ कायम आहे.
पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील जमिनींना एमआयडीसी, आयटी कंपन्यांमुळे सोन्याचे भाव आले. त्यामुळे दोन्ही शहरांच्या बाजूला असलेल्या हवेली, मुळशी व मावळ भागात गाववाल्यांनी एकरातील शेतीचे गुंठे पाडून विकले. त्यातून तयार झालेले गुंठामंत्री राजकारणात आले. क्षमता नसतानाही हातात कोट्यवधी खेळू लागले. सुरुवातीला महागड्या गाड्या घेण्याची स्पर्धा लागली. पुढे जमिनीचे व्यवहार करून एजंटगिरी वाढली. शेतकरी व गुंतवणूकदारांशी व्यवहार करताना ‘पत’ दाखविण्यासाठी ही मंडळी गळ्यात, मनगटात, बोटांत सोन्याचे दागिने घालून प्रदर्शन करू लागली. प्रसिद्धीचा सोस वाढला.
रमेश वांजळे यांच्यापासून सुरू झालेले क्रेझ इतकी वाढली की ते लोकप्रिय होऊन आमदारही झाले. त्यानंतर ‘गोल्डन मॅन’ म्हणून राज्यभर प्रसिद्धी मिळाली. पुण्याच्या संगमवाडी परिसरातील सम्राट मोझे या तरुणाने सोनसाखळी, हातात कडे व अंगठ्या घातल्या. त्याच्यासोबत फोटो काढून तरुणांनी फ्लेक्स उभारले. त्यावर कढी करीत पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरीचे दत्ता फुगे यांनी चिटफंडच्या व्यवसायातून पैसा मिळवून तीन किलोंचा सोन्याचा शर्ट बनवून घेतला. देशातील पहिला सोन्याचा शर्ट म्हणून लिम्का बुकमध्ये रेकॉर्ड नोंदविण्याचाही प्रयत्न त्यांनी केला.
कोण आहेत शंकर कुऱ्हाडे
शंकर कुुऱ्हाडे यांचे मूळ गाव कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील बडोल. बांधकाम, मंजुरीच्या कामानिमित्त वडिलांबरोबर १९८० मध्ये ते पिंपरी-चिंचवड शहरात आले. नेहरूनगर येथील मजूर कॉलनीत राहून पालिकेच्या शाळेत सातवीपर्यंत शिकले. वडिल बांधकामाची कामे घेत होते. त्यांच्या हाताखाली शंकर यांनी बांधकाम व्यवसायाचे धडे घेतले. काही वर्षांतच स्वतंत्रपणे भोसरी, चाकण परिसरातील औद्योगिक क्षेत्रात (एमआयडीसी) कारखाने व उद्योगांचे बांधकाम-शेड उभारण्याची कामे घेऊ लागले.