इंदापूर : इंदापूर जनतेला माहिती आहे. तालुक्यात किती मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. जनतेनी मंत्री पदाच्या खुर्चीवर बसविले आहे म्हणजे जनतेसाठीच काम करायचे असते. मी मुंबईला जाऊन नुसती शोबाजी करीत नाही. जनतेची कामे करतो, असे प्रतिपादन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
इंदापूर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शनिवार (दि. ४) रोजी इंदापूर येथे युवक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, कार्याध्यक्ष अतुल झगडे, युवक तालुकाध्यक्ष ॲड. शुभम निंबाळकर, कार्याध्यक्ष सचिन खामगळ, शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे आदी उपस्थित होते.
राज्यमंत्री भरणे म्हणाले की, विरोधी पक्षातील अनेक चांगले कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद व पंचायत समिती याचसोबत इंदापूर नगरपरिषद यावरती राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी सर्व युवकांनी व पदाधिकाऱ्यांनी आपापसातील हेवेदावे सोडून पक्ष हिताचे काम करावे. गावातील गट तुमची ग्रामपंचायत- सोसायटीची निवडणूक गावातच राहू द्या. ते राजकारण तालुका पातळीवरील कोणत्याही निवडणुकीत आणू नका. यामुळे पक्षाचे नुकसान होते. मागील निवडणुकीच्या काळातील हेवेदावे विसरून आपल्यातील गट-तट बाजूला सारून प्रामाणिकपणे पक्षवाढीसाठी काम करा, असे आवाहन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.
या वेळी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख म्हणाले की, युवक काँग्रेसमध्ये काम करत असताना पक्ष निष्ठा ठेवून काम केल्यास पक्ष निश्चित दखल घेतो. यातूनच उद्याचा प्रदेशाध्यक्ष निवडला जाईल. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यात विकासकामे सुरू आहेत. राज्यमंत्री भरणे राज्याचे नेतृत्व करत असताना विशेष करून इंदापूरच्या विकासाकडे त्यांचं लक्ष आहे. पक्षप्रमुख शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांचे इंदापूरकडे विशेष लक्ष आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर म्हणाले की, पक्षाने अनेक युवकांना स्वतःला सिद्ध करण्यासाठी एक नामी संधी दिली आहे. या संधीचा युवकांनी समाजहिताठी वापर करावा. सर्वांनी एक दिलाने काम करून पक्ष संघटनेला बळकटी द्यावी.
यावेळी तालुका युवक अध्यक्ष शुभम निंबाळकर व कार्याध्यक्ष सचिन खामगळ तसेच त्यांच्या सर्व टीमचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.
____________________________________________________
चौकट : अनेकांचे स्वागत करावे लागणार
झालेल्या विधानसभा निवडणुकीत एखाद्या कार्यकर्त्यांनी जर विरोधात मतदान केले असेल, तरी त्या वेळेची त्याची चूक त्यांनी दुरुस्त केली व तो पक्षात आला तर त्याचेही स्वागत करा. त्याला अपमानास्पद वागणूक देऊ नका. किंवा जुने हेवेदावे काढून त्यांना पक्षात येण्यापासून रोखू नका. कार्यकर्ता हा प्रामाणिक असला पाहिजे त्याच्या कामाची दखल पक्षात घेतली जाते. त्यामुळे पक्षासाठी चांगले काम केल्यास चांगली संधीही राष्ट्रवादी पक्षात दिली जाते. असेही राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
--
फोटो क्रमांक : ०४इंदापूर भरणे
फोटो ओळ : इंदापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवक मेळाव्यात मार्गदर्शन करताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व मान्यवर.