पुणे : आदिवासी विकास विभागाच्या सोमवार पेठेतील व हडपसर येथील शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थिनींनी मंगळवारची रात्र जागून काढल्याचा प्रकार समोर आला आहे. निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात आहे. फळे व बिस्किटे बंद केली आहेत. शैक्षणिक वर्ष सुरू होऊन दोन महिन्यांहून अधिक कालावधी उलटला तरीही अद्याप शैक्षणिक साहित्य मिळालेले नाही. त्यामुळे वसतिगृहातील विद्यार्थिनींनी वसतिगृहाच्या कार्यालयात बसून उपोषण केले. शासनातर्फे पुरविण्यात येणाºया सोयीसुविधा वेळेत मिळत नसल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला. प्रकल्प अधिकारी आल्याशिवाय आणि तोडगा निघाल्याशिवाय आंदोलन थांबवणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यावर बुधवारी दुपारी प्रकल्प अधिकाºयांनी भेट दिल्यानंतर विद्यार्थिनींनी आंदोलन मागे घेतले.सोमवार पेठ व मगरपट्टा, हडपसर येथे आदिवासी मुलींचे वसतिगृह चालविले जात आहे. मुलींचे वसतिगृह असतानाही तेथे आवश्यक सुरक्षाव्यवस्था उपलब्ध नाही. अभ्यासिका नाही. मासिक निर्वाहभत्ता वेळेत दिला जात नाही. त्यामुळे अनेक मुलींची गैरसोय होत आहे. यामुळे विद्यार्थिनींनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. बुधवारी दुपारी प्रकल्प अधिकारी रामचंद्र सोनकवडे यांनी वसतिगृहाला भेट दिली. तसेच, त्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर मुलींनी आंदोलन मागे घेतले.- विद्यार्थिनींच्या मागण्यांचे निवेदन मिळाले असून, माझ्या स्तरावरील मागण्यांबाबत उपाययोजना केल्या जातील. गृहपालांच्या बदल्यांसंदर्भात वरिष्ठांना अहवाल दिला जाईल. क्षेत्रीय अधिकाºयांची समिती नेमून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. लवकरच कंत्राटी पद्धतीवरील सुरक्षारक्षकाची नियुक्ती केली जाईल. १ सप्टेंबरपासून नवीन कंत्राटदाराकडे जेवणाची जबाबदारी दिली जाईल, असे रामचंद्र सोनकवडे यांनी सांगितले.
वसतिगृहातील मुलींनी जागून काढली रात्र! हडपसर येथील वसतिगृहातील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 06:34 IST