पुणे : शहरामध्ये साचत चाललेल्या कचऱ्यामुळे गॅस्ट्रो, कावीळ, मलेरिया यासारखे साथीचे रोग पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. साचलेला कचरा कुजण्यास सुरुवात झाल्यानंतर त्याचे गंभीर परिणाम पुणेकरांच्या आरोग्यावर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.उरुळी देवाची व फुरसुंगी येथील कचरा डेपोमध्ये ३१ डिसेंबरनंतर कचरा टाकणे बंद झाल्याने शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. १ जानेवारी रोजी शहरात साठणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर पर्यायी मार्ग वापरले जात आहेत. मात्र, दररोजचा १,५०० टन कचऱ्याची विल्हेवाट लावणे प्रशासनाच्या आवाक्याबाहेर जात आहे. याबाबत डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितले, ‘‘कचरा कुजल्यामुळे सर्वांत पहिल्यांदा प्रदूषित वायू तयार होऊन दुर्गंधी पसरण्यास सुरुवात होते. या वायूमुळे श्वासाचे त्रास होऊ शकतात. त्यानंतर कचऱ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जंतू तयार व्हायला सुरुवात होते, तसेच माशा वाढतात. त्यातून अतिसार, टायफॉइड, मलेरिया यासारखे रोग मोठ्या प्रमाणात फैलावण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत जर पाऊस पडला, तर परिस्थिती आणखी गंभीर बनू शकते.’’ (प्रतिनिधी)कचरा साचलेल्या कंटेनरच्या ठिकाणी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून गुरूवारपासून जंतुनाशकांची फवारणी करण्यात येणार आहे. आरोग्य विभागाचे ७५ कर्मचारी या कामासाठी नेमण्यात आले आहेत. तसेच, नागरिकांनीही योग्य ती दक्षता घ्यावी, बाहेरचे खाणे टाळावे, पाणी उकळून प्यावे.- एस. टी. परदेशी, आरोग्यप्रमुख४शहरात निर्माण झालेल्या कचराकोंडीच्या पार्श्वभूमीवर कचऱ्याचे वर्गीकरण करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे ओला कचरा वेगळा होऊन त्याची विल्हेवाट लावणे सोपे जाणार आहे. त्यामुळे शहरातील कचरा वर्गीकरण करण्यासाठी घनकचरा विभागातील १,६०० कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांना दिवस-दिवसभर कचऱ्यात बसावे लागते. कचऱ्यात येत असलेल्या सुया, सॅनिटरी नॅपकीन, वैद्यकीय कचरा यांच्या हाताळणीमुळे त्यांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत.
कचरा साचला, आरोग्य धोक्यात!
By admin | Updated: January 8, 2015 01:08 IST