लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे महानगराला गणेशोत्स्वाची मोठी परंपरा आहे. नागरिकांमध्ये जनजागृतीचे मोठे कार्य गणेश मंडळाच्या माध्यमातून होत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरासह पुणे जिल्ह्यातील गणेश मंडळांनी स्वीप कार्यक्रमामध्ये मतदार जनजागृतीसाठी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले. स्वीप कार्यक्रमात गणेश मंडळाचे योगदान महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
जिल्हाधिकारी कार्यालयात गणेश मंडळाचे अध्यक्ष व प्रतिनिधीसोबत स्वीप कार्यक्रम स्पर्धा, तसेच मतदार जनजागृतीबाबत बैठक झाली. या वेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत, मतदार नोंदणी अधिकारी संतोषकुमार देशमुख व सुरेखा माने उपस्थित होते.
देशाच्या लोकशाही व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी मतदारजागृतीच्या प्रयत्नात गणेशमंडळांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन करून जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, जनजागृतीचे मोठे कार्यही गणेश मंडळाच्या माध्यमातून होत आहे. युवा, दिव्यांग, शहरी नागरिक, स्थलांतरित, ग्रामीण व आदिवासी नागरिक, तृतीयपंथी, तसेच महिला यांना मतदान प्रकियेत सहभागी करून घेण्यासाठी गणेश मंडळांनी स्वीप कार्यक्रमात सहभाग नोंदवावा. नवमतदारांची तसेच सर्व स्तरातील मतदारांची नोंदणी वाढविणेसाठी जनजागरुकता करून त्यांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी गणेश मंडळाचा स्वीप कार्यक्रमातील सहभाग महत्त्वाचा ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत यांनी स्वीप कार्यकमाची संकल्पना, कार्यक्रमाचे स्वरूप, सहभाग, सजगता, उद्दिष्टे सांगितली. तसेच उपक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली.