सकाळपासूनच होमहवन, पूजा आणि अभिषेक याने सोहळ्याला सुरुवात झाली होती. शहरातील मंडळांनी मंदिरासमोर होमहवनाचे आयोजन केले होते. गणरायाची मंदिराला फुले, विद्युत रोषणाई, माळा, रांगोळ्या यांची सजावट करण्यात आली होती. लाडू, पेढे, द्रोणमधून खिचडी असे जागोजागी प्रसाद वाटप करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंडळांनी महाप्रसाद रद्द करण्यात आले होते. त्याऐवजी स्तुत्य उपक्रम राबविण्यात आले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपतीचा गणेशजन्म सोहळा
गजवदना पतित पावना...बाळा जो जो रे...निद्रा करी बाळा, मृत्युंजय नंदना बाळा जो जो रे... अशा महिलांच्या जयघोषात दुपारी १२ वाजता थाटात गणेशजन्म सोहळा पार पडला. मंदिरावर केलेली आकर्षक सजावट आणि गाभाऱ्यात केलेली पुष्पआरास भाविकांचे लक्ष वेधून घेत होती.
या वेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, प्रकाश चव्हाण, सौरभ रायकर, मंगेश सूर्यवंशी, यतीश रासने यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. शारदा गोडसे, संगीता रासने, ज्योती सूर्यवंशी, मृणालिनी रासने यांनी गणरायाचे पूजन केले. पहाटे स्वराभिषेक कार्यक्रमाने सुरुवात झाली. इंडियन आयडॉल फेम नंदिनी आणि अंगद गायकवाड यांनी श्रीं चरणी स्वराभिषेकाद्वारे गायनसेवा अर्पण केली. त्याबरोबरच दिवसभरात गणेशभक्तांच्या हस्ते याग, गणेश जागर, सहस्रवर्तने यांचे आयोजन करण्यात आले होते.
अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाननाचा जन्मसोहळा
शिवपार्वतीच्या नंदना बाळा जो जो रे...नाव ठेवले गणपती गजवदना बाळा जो जो रे... म्हणत पाळणा हलवून अखिल मंडई मंडळात गणेशजन्म सोहळा साजरा करण्यात आला.
सकाळी उमाकांत आणि सायली कोकाटे हस्ते मूर्तीला अभिषेक करण्यात आला. त्यानंतर ८ वाजता गणेशयाग करण्यात आला. या वेळी निर्मला केंढे, सुचेता थोरात, मोनाली मोरे, अनुजा थोरात, साधना मते, मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, विश्वास भोर आदी उपस्थित होते.
अण्णा थोरात म्हणाले, अखिल मंडई मंडळामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिकरीत्या गणेशजन्म सोहळा साजरा करण्यात आला. दरवर्षी होणारी नगर प्रदक्षिणा पालखी सोहळा यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
तुळशीबाग महागणपतीचा पारंपरिक पद्धतीने गणेशजन्म सोहळा साजरा
मानाचा चौथा श्री तुळशीबाग मंडळाच्या महागणपतीचा गणेशजन्म सोहळा पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. गणेशयाग आणि धार्मिक विधी झाल्यानंतर आमदार मुक्ता टिळक यांच्या हस्ते जन्मसोहळा पार पडला. या वेळी मंडळाचे अध्यक्ष शिल्पकार विवेक खटावकर, उपाध्यक्ष मोहनशेठ साखरीया, विनायक कदम, कार्याध्यक्ष विकास पवार, कोषाध्यक्ष नितीन पंडित, किरण चौहान व मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
---------------------
महाप्रसाद रद्द करून रक्तदान
यंदाच्या गणेशजन्म सोहळ्यात मंडळांकडून होमहवन, पूजा आणि अभिषेक हे धार्मिक विधी करण्यात आले. महाप्रसाद रद्द करून रक्तदान आणि आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप करण्यात आले. संस्थांना अन्नदानही करण्यात आले.