लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : नाना पेठेतील सुरज ठोंबरे व त्याच्या टोळीवर दोनच दिवसांपूर्वी पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली. यातील फरार आरोपींच्या शोधासाठी सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळी पथके स्थापन केली होती. त्यातील गोट्या ऊर्फ नरसिंग भिमा माने हा मंगळवार पेठेत पत्नीला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. समर्थ पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक विशाल मोहिते, अंमलदार निलेश साबळे, सुमित खुट्टे व महेश जाधव यांनी तेथे सापळा रचला. पत्नीला भेटायला आलेल्या नरसिंग माने याला अटक केली. माने हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध सांगवी पोलीस ठाणे व फरासखाना पोलीस ठाण्यात दरोड्याची तयारी, जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. अधिक तपासासाठी न्यायालयाने त्याला २२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली.