नारायणपूर : पुरंदर तालुका सीताफळ, अंजीर, पेरू, डाळिंब आदी फळबागांसाठी प्रसिद्ध आहे. सध्या सीताफळ, अंजीर, पेरू यांचा हंगाम मोठ्या प्रमाणात आहे. यावर्षी सीताफळाचे, पेरूचे उत्पादन वाढल्याने पुरंदरची बाजारपेठ असलेल्या सासवडच्या फळबाजारात फळांची आवक साधारणच होत आहे. मात्र सध्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटाबंदीने शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे.बाजारात याच नोटा मिळत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. व्यापारी शेतकऱ्यांची अडवणूक करीत याच नोटा घेण्यास भाग पाडत आहेत. नाईलाजाने शेतकऱ्यांना याच नोटा घ्याव्या लागत आहेत. सासवड बाजारपेठ असल्याने तालुक्यातील बहुतेक शेतकरी याठिकाणी आपला माल विक्रीस आणत आहेत. मागील काही दिवसांपूर्वी बाजारात मोठी आवक झाल्याने सीताफळाचे बाजारभाव कमी झाले आहेत. हे दर पुन्हा पूर्वपदावर येत नाहीत तोपर्यंत ५०० आणि १००० रुपयांच्या नोटाबंदीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. याठिकाणी शेतकऱ्यांना थेट माल विकता येत असल्याने शेतकरी पुणे, मुंबईपेक्षा याच ठिकाणी माल विकणे पसंत करतात. कारण याठिकाणी दलालाची गरज नसल्याने शेतकऱ्यांना हा पर्याय परवडत आहे. सुटे पैसे नसल्याचे कारण देत व्यापारी माल घेण्यास टाळाटाळ करीत आहेत.(वार्ताहर)
नोटाबंदीने फळांचे भाव गडगडले
By admin | Updated: November 16, 2016 02:59 IST