पुणे : लोहखनिजाच्या व्यवसायामध्ये गुंतवणूक केल्यास ५ दिवसांना एक लाख रुपये नफ्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाला १६ लाख २० हजारांना गंडा घालण्यात आला. या प्रकरणी समर्थ पोलिसांनी एका महिलेसह दोन जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ज्योतिरंजन मिश्रा, सुदीप सामल (वय ३५, रा. राऊरकेला, ओडिशा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी नितीन देसाई (वय ५२, रा. घोले रोड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देसाई चार्टर्ड अकाउंटंट आहेत. आरोपी मिश्रा आणि सामल यांची देसाईंशी एका ग्राहकामार्फत ओळख झाली होती. देसाई यांना भूलथापा देऊन ओडिशामध्ये लोहखनिजाच्या खाणींचा व्यवसाय तेजीत असून, या व्यवसायामध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल, असे सांगितले होते. १५ लाख २० हजारांची गुंतवणूक केल्यास ५ दिवसांना एक लाखाचा नफा होईल, अशी बतावणी केली. त्यानुसार देसाई यांनी वेळोवेळी श्री साईबाबा मिनरल या कंपनीच्या खात्यावर १६ लाख २० हजार रुपये भरले. ही रक्कम आरोपींनीही वेळोवेळी काढून घेतली. देसाई यांना कोणताही नफा अगर मूळ रक्कम परत न करता फसवणूक केली. पुढील तपास व्ही. एल. चव्हाण करीत आहेत. (प्रतिनिधी)
गुंतवणुकीच्या बहाण्याने फसवणूक
By admin | Updated: October 21, 2014 05:28 IST