पिंपरी : वयोवृद्धांच्या समस्या जाणून घेऊन सोडविण्यासाठी पुणे पोलिसांनी सुरू केलेल्या हेल्पलाईनवर तक्रारींचा पाऊस पडला आहे. दोन महिन्यांत सुमारे साडेचारशे तक्रारी दाखल झाल्या आहेत. मुलाकडूंन सांभाळ केला जात नसल्याच्या सर्वाधिक तक्रारी आहेत. पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाने १५ आॅगस्ट २०१६पासून वयोवृद्धांच्या तक्रारी सोडविण्यासाठी १०९० ही हेल्पलाइन सुरू केली आहे. या हेल्पलाईनवर वयोवृद्धांना आपल्या कोणत्याही तक्रारी चोवीस तास मांडण्याची सोय करण्यात आली आहे. तक्रारींचा निपटारा करण्यासाठी स्वतंत्र पोलीस अधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांचीदेखील नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यांत ४४० तक्रारी दाखल झाल्या आहेत. या तक्रारीमध्ये मुलांनी सर्व संपत्ती त्यांच्या नावावर केली. मात्र, आता व्यवस्थित सांभाळ करत नाही. तर काही वृद्धांकडून मुले संपत्ती नावावर करण्यासाठी सातत्याने भांडत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. वेळेवर जेवायला मिळत नाही, सून मानसिक त्रास देते, तर काही ठिकाणी मुलेदेखील आरडाओरड करत असल्यामुळे आम्ही कुठे जाऊ ? असा प्रश्न वृद्धांकडून हेल्पलाईनवर विचारला जात आहे. सेवानिवृत्तीनंतर येणारी पेन्शनसुद्धा मुले हिसकावून घेतात आणि आम्हाला वेगळे केले आहे. अशा कौटुंबिक व सामाजिक तक्रारी दाखल होत आहेत. (प्रतिनिधी)
दोन महिन्यांत साडेचारशे तक्रारी
By admin | Updated: October 15, 2016 03:06 IST