वाघोली : वाघोली (ता. हवेली) येथील पुणे-नगर रोड वरील कटकेवाडी परिसरात वेअर हाऊसचे पार्किंगमधील चारचाकी गाड्यांच्या बॅटऱ्या चोरून नेणाऱ्या तिघांवर पोलिसांनी कारवाई केली. यातील दोघेजण अल्पवयीन मुले आहेत. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा व ८ बॅटऱ्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार: रात्रीच्या वेळी बॅटऱ्या चोरीचे प्रकार वाढत असल्याने गुन्हे शोध पथकाच्या वेगवेगळ्या टीम तपास करीत होत्या. कटकेवाडी फाटा येथे तिघेजण रिक्षामध्ये विना मास्क बसलेले होते. पथकातील कर्मचारी त्यांच्याकडे जात असताना रिक्षाचे ड्रायव्हर सीटवर बसलेला एकजण विठ्ठलवाडी कमानीच्या बाजूने पळून गेला. म्हणून गुन्हे शोध पथकास त्यांचा संशय आल्याने इतर दोघांना जागीच पकडले. ते दोघेही अल्पवयीन होते. त्यांच्या मदतीने पळून गेलेला रेहान अन्वर सय्यद (वय २४, रा.खडकी बाजार, पुणे) यास वाघोली पीएमटी बस स्थानकातून ताब्यात घेतले. अल्पवयीन मुलांना बाल न्याय मंडळ,येरवडा पुणे यांचे न्यायालयात हजर करण्यात आले आहे. तिघांकडून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा,लोखंडी कटावणी, लोखंडी पक्कड,बॅटरी काढण्यासाठी लागणारा लोखंडी रॉड, तसेच गुन्ह्यांतील एकूण ८ बॅटऱ्या असा एकूण 1,65,310 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रेहान सय्यद यास न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हवेलीच्या उपविभागीय अधिकारी सई भोरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंदचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर हे करत आहेत.