माजी राज्यमंत्री यांनी गेल्या आठवड्यात पत्रकार परिषद घेऊन संजय जगताप यांच्यावर टीका केली होती. यावर बोलताना जगताप म्हणाले, ‘माजी राज्यमंत्री हे नकारात्मक विचाराचे आहेत. सकारात्मक विचार करीत नाहीत. त्यांना विमानतळाचे मागे काय होईल याची चिंता आहे, पण पुढे काय होईल याचा विचार नाही. त्यामुळे त्यांना फार महत्त्व देणार नाही. मात्र विमानतळाचे जागेबाबत शेतकऱ्यांच्याबरोबर चर्चा करूनच निर्णय होईल. कोणतेही गाव विस्थापित होऊ देणार नाही, याची खात्री देतो. गुंजवणी योजनेबाबतही माझा अभ्यास झाला आहे. या योजनेचे पाणी पुरंदरमधील शिवरी गावाजवळून सोमर्डी गावाकडे नेण्याचा उल्लेख आहे. ही उलट दिशा आहे. सोमर्डीकडून पाणी आले पाहिजे, असे माझे मत आहे. यासाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे प्रस्ताव दिला आहे. शिवतारे मोठ्या पाईपजवळ उभे राहून फोटो काढतात, पण तालुक्यात किती इंची पाइपलाइन येणार आहे ती दाखवावी व त्यासमवेत फोटो काढावेत,’ असा टोलाही जगताप यांनी लगावला. पुरंदरमधील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मी फार भाग घेतला नाही. काही ठिकाणी बोलाविले म्हणून गेलो. कोणाच्याही विजयात व पराभवात माझा हात नाही. तरुणाचे प्रतिनिधी निवडून आले आहेत. या सदस्यांना प्रशिक्षण देण्यासाठी शिबिर आयोजित करणार आहे. गावात कोणत्या योजना आणायच्या, याचे प्रशिक्षण देण्याची योजना खासदार सुप्रिया सुळे यांच्या सहकार्याने आखली आहे, असेही जगताप यांनी सांगितले.
माजी राज्यमंत्री हे नकारात्मक विचाराचे : आमदार संजय जगताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:09 IST