लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कृषी कायदा करताना सरकारने कुणालाही विश्वासात घेतलेले नाही. सरकारविरोधात आंदोलन केले की कारवाई होते. संविधानाने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. पण सत्तेतील लोकं संविधानाला महत्त्व देत नाहीत की काय असा प्रश्न पडतो, अशा शब्दांत आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली.
महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक पुणे विचारपीठ व आडकर फाउंडेशन यांच्या वतीने महामाता रमामाई आंबेडकर यांच्या १२४ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पवार यांनी रमाईंच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. अॅड. प्रमोद आडकर, नगरसेविका लता राजगुरू, विठ्ठल गायकवाड, सचिन ईटकर, रवींद्र माळवदकर उपस्थित होते.
लोकांसाठी आयुष्य वेचणाऱ्या महामानवांचे कार्य पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. महापुरुषांची जयंती-पुण्यतिथी साजरी करताना तरुणांनी विधायक कार्याला महत्त्व दिले पाहिजे, अशी अपेक्षाही पवार यांनी व्यक्त केली. संविधानाचे महत्त्व अधोरेखित करताना ते म्हणाले, संविधानाने आपल्याला समानतेचा हक्क दिला आहे. संविधान केंद्रबिंदू मानूनच प्रत्येकाला वाटचाल करावी लागणार आहे. संविधानाचे महत्त्व पटवून देण्याची जबाबदारी आपली आहे.
रवींद्र माळवदकर यांनी महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या निर्मितीविषयी माहिती दिली. विठ्ठल गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. लता राजगुरू यांनी आभार मानले.