पिंपरी : आयुक्त कोणीही असो, न्यायालयीन आदेशाला अधीन राहून महापालिकेला अनधिकृत बांधकामांविरुद्धची कारवाई करावीच लागणार आहे, असे तत्कालीन आयुक्त श्रीकर परदेशी वारंवार सांगत होते. परंतु आयुक्त परदेशी केवळ पाडापाडीसाठीच आले आहेत, असा नागरिक आणि राजकीय पदाधिकाऱ्यांमध्ये गैरसमज पसरला होता. मात्र मे महिन्यात त्यांची बदली झाली. त्यांच्या जागी राजीव जाधव रुजू झाले. तेव्हापासून १२० अनधिकृत बांधकामांवर कारवाई झाली आहे. महापालिकेने मे २०१३ मध्ये अनधिकृत बांधकामाविरुद्धची मोहीम सुरू केली. तेव्हापासून ते आयुक्त परदेशी यांची बदली होईपर्यंतच्या १८ महिन्यांच्या कालावधीत ५६० अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची कारवाई झाली. परदेशी यांच्या बदलीनंतर आयुक्तपदी जाधव रूजू झाले. अनधिकृत बांधकामावरील कारवाईचा आकडा ५६० वर पोहाचला आहे. आयुक्त जाधव यांच्या काळात ५ महिन्यांत १२० बांधकामे पाडली. अनधिकृत बांधकाम करणाऱ्या २२०७ जणांवर फौजदार गुन्हे दाखल झाले. परदेशी यांच्या काळात गुन्हे दाखल झालेल्या नागरिकांची संख्या २१८० होती. त्या संख्येतही वाढ झाली आहे. उच्च न्यायालयाचा आदेश असल्याने अनधिकृत बांधकामविरोधी कारवाईसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. १५५ कर्मचारी नियुक्त करण्याच्या प्रस्तावास स्थायी आणि महापालिका समितीची मान्यता घेण्यात आली. अनधिकृत बांधकामप्रकरणी तोडगा काढण्यास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आदेशानुसार राज्यातील आयुक्तांची समिती स्थापन केली. यात सदस्य असल्याने एका बैठकीस उपस्थिती लावली आहे. दुसरी बैठक २४ सप्टेंबरला होणार आहे, असे आयुक्त जाधव यांनी नमूद केले.(प्रतिनिधी)
पाच महिन्यांत १२० बांधकामे पाडली
By admin | Updated: September 11, 2014 04:25 IST