सासवड : जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विजय कोलते यांच्या सासवड येथील विजय आॅफसेट प्रिंटिंग प्रेसला आग लागून त्यामध्ये सुमारे ७ लाखांहून अधिक रकमेचे नुकसान झाले आहे. रविवारी मध्यरात्री एकच्या सुमारास ही आग लागली. रात्रीची वेळ असल्याने प्रेसमधील दोन संगणक, चार प्रिंटर्स, फर्निचर, सीसीटीव्ही संच, एक दूरदर्शन संच आदी साहित्य जळून खाक झाले आहे. पहाटे सासवड नगरपालिकेच्या अग्निशामक गाडीने आग विझवण्यात आली. याबाबत सासवड पोलिसांकडे फिर्याद दिल्याचे प्रेसचे व्यवस्थापक शिवाजी कोलते यांनी सांगितले. सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका असून, राजकीय वैमनस्यातून हे कृत्य केले असल्याचा शिवाजी कोलते यांचा दावा आहे. प्रेसच्या एसी संचावर कोणीतरी अज्ञाताने रॉकेल टाकले असल्याचेही शिवाजी कोलते यांनी पत्रकारांना सांगितले. सासवड पोलिसांनी याबाबत पंचनामा केला असून, सहायक फौजदार एस. एन. महाजन पुढील तपास करत आहेत .
विजय कोलते यांच्या प्रिंटिंग प्रेसला आग
By admin | Updated: February 21, 2017 01:58 IST