पुणे: ‘आमच्याच पोरांना हाताशी धरून आमच्याच पोरांवर हल्ले करण्याचे धाडस व्हायला लागले आहे, यालाच सत्तेचा माज म्हणतात. संभाजी ब्रिगेडच्या प्रमुखांवर हल्ला केला, त्यांच्यावर तर कारवाई व्हायलाच हवी, मात्र या हल्ल्यामागचा मास्टरमाईंड शोधून त्यांच्यावर कारवाई करा, अन्यथा आम्ही त्यांना सोडणार नाही’ असा इशारा संभाजी ब्रिगेड व अन्य समविचारी संघटनांच्या जाहीर सभेत सोमवारी देण्यात आला.
संभाजी ब्रिगेडचे प्रमुख प्रविण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे संतप्त झालेल्या विविध संघटनांनी शिवाजी व्यायाम मंदिरासमोर सोमवारी सकाळी जाहीर सभा घेतली. त्यात हल्ल्याचा निषेध करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या जेम्स लेनपासून असे प्रकार सुरू आहेत. सत्ताप्राप्ती झाल्यानंतर त्यात वाढ झाली आहे. प्रविण गायकवाड गेली अनेक वर्षे संभाजी ब्रिगेडचे नेतृत्व करत आहेत. जात पात न मानता शिवविचार केंद्रभागी ठेवून त्यांनी बहुजन समाजातील अनेक युवकांना उद्योग व्यवसाय सुरू करण्याची, परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची, नोकरी करण्यापेक्षा उद्योजक होऊन नोकऱ्या देण्याची प्रेरणा दिली. त्यांच्या याच कामाचा धसका घेऊन त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. हल्लेखोर वेगळे आहेत व त्यांना या पद्धतीने भडकावणारे वेगळे आहेत. त्यांचे हेतू चांगले नाहीत. समाजात भांडणे लावण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप यावेळी वक्त्यांनी केला.
संभाजी ब्रिगेड हे नाव आजकालचे नाही. जुने आहे. तरीही प्रविण गायकवाड यांनी त्याविषयी सुधारणा करण्याचे सांगितले होते. त्यात तांत्रिक अडचणी होत्या. मात्र विचारांची लढाई विचारांनीच करायची हेच ज्यांना मान्य नाही तेच अशा प्रकारचे हल्ला करू शकतात.
काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, रविंद्र माळवदकर, शिवसंग्रामचे तुषार काकडे, महेश पवार, रविंद्र भोसले तसेच पुरूषोत्तम खेडेकर, इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे, संतोष शिंदे, गंगाधर बनबरे, मराठा सेवा संघाच्या सारिका कोकाटे, सत्यशोधक समाजाच्या प्रतिमा परदेशी, संभाजी ब्रिगेडचे प्रदीप कणसे, हर्षवर्धन मगदूम, पैगंबर शेख, शिवमहोत्सव समितीचे विकास पासलकर, विराज तावरे, प्रशांत धुमाळ, रोहन पायगुडे, सुनील माने, उदय महाले, गणेश नलावडे, किशोर कांबळे, शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, नागेश खडके, रेखा कोंडे, श्रीकांत शिरोळे व अन्य अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते सभेला उपस्थित होते.