सुपे : बारामती तालुक्यातील सुपे येथील सरपंच स्वाती अनिल हिरवे यांच्याविरोधात बुधवारी ( दि.२७ ) दुपारी ग्रामपंचायतीच्या दहा सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे.
बारामतीचे तहसिलदार विजय पाटील यांच्या समोर दहा सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या पत्रावर स्वाक्षऱ्या केल्याने येत्या २ फेब्रुवारीला विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर या सभेचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्त करणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.
येथील सरपंच स्वाती हिरवे असुन सर्वस्वी कारभार पतिराज पाहत असल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे. तसेच मासिक मीटिंगनंतर काही विषय परस्पर प्रोसेडिंगवर घेतले जातात. ग्रामपंचायतीच्या जमाखर्चाचा विषय मागितला असता सरपंच यांच्या पतिकडून धमकी दिली जाते. आम्ही सदस्यांनी घेतलेले विकासकामाचे निर्णय विचारात घेतले जात नाहीत. सरपंच यांच्याबरोबर विकासासाठी चर्चा करण्यासाठी गेलो असता, सरपंच म्हणतात, की जी काही चर्चा असेल ती माझ्या पतिसोबत करावी. तेच सर्वस्वी निर्णय घेतील, असे सरपंच सांगत असल्याने सदस्यांची कुचंबणा होत होती. तसेच येथील कोणत्याच सदस्याला विश्वासात न घेता कामकाज सुरु असल्याने सरपंचाच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला असल्याचे तहसीलदार पाटील यांना देण्यात आलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. या पत्रावर मीनाक्षी बारवकर, भाग्यश्री बसाळे, रेखा चांदगुडे, राजेश्री धुमाळ, ज्योती जाधव, सुधीर बारवकर, अशोक सकट, मुनीर डफेदार, शौकत कोतकाल, गणेश जाधव आदी दहा सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.