लोकमत न्यूज नेटवर्क
जुन्नर : ६ कोरोना विषाणु संसर्गावर मात करण्यासाठी औषध शोधून काढल्याचा पंतांजली उद्योग समुहाच्या दाव्यासंदर्भात योगगुरू बाबा रामदेव व आचार्य बाळकृष्ण यांच्यावर तक्रारदार अॅड. मदन कुऱ्हे यांनी दाखल केलेल्या फौजदारी खटल्याची जुन्नर न्यायालयात सुनावणी झाली.
वकील असीम सरोदे यांनी न्या.एम ए कुलकर्णी यांच्यासमोर युक्तीवाद करतांना करोना वर कोरोनिल नावाची लस व औषध यासंदर्भात योगगुरू रामदेव बाबा घेतलेली पत्रकार परिषद ही बेकायदेशीर व कायद्याच्या प्रक्रीयेला आव्हान देणारी होती असे सांगितले. त्यामुळे तक्रारदार अॅड. मदन कुऱ्हे यांनी पत्रकार परीषद पाहुन दाखल केलेली केस पुढील कायदेशीर कारवाई करण्यास पात्र आहे, असा युक्तिवाद असीम सरोदे यांनी केला. भारतात कुठेही कोणीही ही पत्रकार परिषद पाहून जर अशी तक्रार दाखल केली असेल तर न्यायालयाने याची गंभीर दखल घेऊन आरोपींविरुद्ध योग्य त्या कलमांनुसार कारवाई करावी अशी विनंती त्यांनी केली. हे सांगताना अनेक महत्वाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या खटल्यांचे दाखले त्यांनी जुन्नर न्यायालयात सादर केले.
कोरोनिल बंदीसंदर्भात अधिकृत नोटिफिकेशनची न्यायालयात दाखल करावे अशी सुचना न्या.एम.कुलकर्णी यांनी केली. न्यायालयाने केसमध्ये घडलेल्या फॅक्ट्स पाहून कायद्याच्या प्रक्रियावादी क्लिष्टते पलीकडे जाऊन विचार करण्याची विनंती असीम सरोदे यांनी केली. यावेळी अॅड. अक्षय धिवरे, अॅड अजित देशपांडे, अॅड. सुदर्शन पारखे, अॅड. भुषण शेटे, अॅड अमोल वाडेकर हेही उपस्थित होते. याप्रकरणाची पूढील सुनावणी ९ एप्रिल रोजी होणार आहे.
चौकटी
पतंजलीने तयार केलेल्या औषधाने कोरोनाबाधित व्यक्तीवर उपचार केल्यास ती व्यक्ती पूर्णपणे बरी होऊ शकते, असा दावा करणारे योगगुुरु बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांच्या विरोधात मदन कुऱ्हे यांनी अँड. असीम सरोदे यांचे मार्फत खाजगी फौजदारी खटला जुन्नर येथील प्रथम वर्ग न्यायालयात दाखल केला आहे. कोरोना विषाणु संसर्गावर मात करण्यासाठी औषध शोधून काढल्याचा रामदेव बाबाच्या दाव्यासंदर्भात राज्यात दाखल झालेला हा पहीलाच खटला आहे.