पुणे : कमी काम करून जास्तीत जास्त श्रेय मिळविण्याची आजकालची मानसिकता आहे. अशा परिस्थितीत प्रसिद्धीचा काकणभरही हव्यास न धरता केवळ मानवता हा धर्म मानून डॉ. प्रकाश आमटे आणि मंदाताई आपटे यांनी स्वत:ला कामात झोकून दिले आहे. त्यांच्या जीवनप्रवासावर आधारित भूमिका करण्याची संधी मिळाल्याने माझे आयुष्यच बदलले. हा मानवतेचा धर्म सर्वांनी पाळायला हवा. स्वत:च्या क्षमतेप्रमाणे इतरांच्या मदतीला धावून जाण्याची तयारी ठेवायला हवी. प्रत्येकाने सजग नागरिक, माणूस म्हणून जगायला शिकले पाहिजे. त्यासाठी मनात संवेदनांचा अंकुर सतत रुजवायला हवा, असे मत ज्येष्ठ अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी व्यक्त केले.दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनी प्रियाकांजी महिला उद्योग संस्थेतर्फे आयोजित राजीव गांधी कला गौरव पुरस्काराने सोनाली कुलकर्णी यांचा सन्मान करण्यात आला. त्या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी माजी मंत्री पतंगराव कदम, माजी सांस्कृतिक मंत्री हर्षवर्धन पाटील, सतीश देसाई, अनंत पाटील, रमेश बागवे, अभय छाजेड, संजीवनी बालगुडे, अभिनेत्री संस्कृती बालगुडे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी दिमाखदार नृत्य स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते.नवोदित कलाकारांना मार्गदर्शन करताना कुलकर्णी म्हणाल्या, ‘सध्याचा काळ तंत्रज्ञानाचा आणि सोशल मीडियाचा आहे. त्यामुळे उदयोन्मुख कलावंतांनी आणि त्यांच्या पालकांनी अद्ययावत ज्ञान मिळवायला हवे. विविध स्पर्धांमध्ये सहभागी झाल्याने प्रोत्साहन मिळते तसेच आत्मविश्वास वाढतो. चांगले कलागुण निश्चितच हेरले जातात. मात्र, त्यासाठी थोडा संयम बाळगायला हवा.’पतंगराव कदम म्हणाले, ‘राजीव गांधी यांचे व्यक्तिमत्त्व विलोभनीय होते. नव्या योजना, दूरदृष्टी, चांगले निर्णयही त्यांच्या कार्याची वैशिष्ट्ये होती. अशा महान नेत्यांचा इतिहास, भूगोल पुसून टाकण्याचा प्रयत्न सध्या केला जात आहे. मात्र, नव्या पिढीला हा इतिहास समजून सांगण्याची नितांत गरज आहे.’ सोनाली कुलकर्णीच्या एकाहून एक सरस भूमिकांचे कौतुक करत यापुढेही अधिकाधिक चांगल्या भूमिका वाट्याला याव्यात, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.’हर्षवर्धन पाटील म्हणाले, ‘माणूस किती वर्षे जगला यापेक्षा कसा जगला, हे अत्यंत महत्त्वाचे असते. कार्यातूनच त्याच्या व्यक्तित्वाची समाजाला ओळख होते. पुणे ही कलाकारांची भूमी आहे. याच मातीतून सोनालीने कलाक्षेत्रात पदार्पण केले. लवकरच तिच्या भूमिकांचा सुवर्ण महोत्सव साजरा व्हावा, अशी सर्व रसिकांची इच्छा आहे.’संतोष चोरडिया यांनी सूत्रसंचालन केले. नगरसेवक संजय बालगुडे यांनी प्रास्ताविक केले.
मनात संवेदनांचा अंकुर रुजावा
By admin | Updated: May 22, 2016 00:59 IST