लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : साखरेच्या निर्यातीची वाढ व उपपदार्थ विक्रीतून मिळणारा फायदा यातील वाटा कारखानदारांनी ऊस उत्पादकांना द्यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली.
रंगराजन समितीचीच तशी शिफारस असल्याने या मागणीत काहीही गैर नाही, ती न्याय मागणी आहे व आम्ही संघटनेच्या स्तरावर त्याचा पाठपुरावा करू, असे शेट्टी यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.
आंतरराष्ट्रीय बाजारात ब्राझील व थायलंड हे सर्वात मोठे साखर पुरवठादार आहेत. दुष्काळामुळे त्यांचे ऊस उत्पादन कमी झाले, उतारा कमी मिळाला, त्यामुळे या वर्षी त्यांची साखर बाजारात फार कमी प्रमाणात आली. त्याचा फायदा भारताला मिळाला. खुल्या बाजारात भारतातील साखरेला चांगला दर मिळाला व ती वाढीव रक्कम थेट कारखान्यांना मिळाली. त्याशिवाय भारतातही सणासुदीमुळे साखरेच्या मागणीत एकदम वाढ झाली. साखरेच्या उपपदार्थांचे दरही वाढले. कारखान्यांच्या आर्थिक फायद्यात वाढ झाली.
तोटा झाला की त्याचा बोजा ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर टाकणाऱ्या कारखानदारांनी आता फायद्याचा वाटा शेतकऱ्यांना द्यावा, अशी मागणी संघटना करत असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. साखरेचा वाढीव दर तसेच उपपदार्थ विक्रीतून मिळालेले पैसे कारखान्याच्या हिशेबात स्वतंत्र जमेस धरले जातात. दर नियंत्रण समिती याचा अभ्यास करत असते. त्यांच्याकडे ही जमा दाखवावी लागते. त्याचा जो काही फायदा असेल तो शेतकऱ्यांना ७५ व कारखान्यांना २५ टक्के दराने द्यावा, असे रंगराजन समिती सांगते. त्यामुळे कारखान्यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या ऊसाची रास्त किफायतशीर रक्कम (एफआरपी) द्यावी व ही जास्तीच्या फायद्याची रक्कम स्वतंत्रपणे द्यावी, असे मत शेट्टी यांनी व्यक्त केले.