लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गोरगरीबांचे व्यवसाय घेण्याची बड्या उद्योजकांची भूक कधी भागणार याची विचारणा करण्यासाठी मुंबईतल्या अंबानी इस्टेटवर राज्यातील शेतकरी संघटना येत्या मंगळवारी (दि. २२) मोर्चा काढणार आहेत.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी ही माहिती दिली. ते बुधवारी (दि. १६) पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव, सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे, स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अमोल हिप्परगे, प्रतिभा शिंदे, राहुल पोकळे आदी यावेळी उपस्थित होते
शेट्टी म्हणाले, “गेल्या २० दिवसांपासून शेतकरी दिल्लीत आंदोलन करीत आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. कोरोना काळात शेती व्यवसाय कंपन्यांना समजला. त्यामुळेच अदानी, अंबानी यांना हा व्यवसाय देण्यासाठी सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे.”
केंद्राने मंजूर केलेले तिन्ही कायदे आणि प्रस्तावित वीज विधेयक रद्द व्हावे, उसाचा एफआरपी कायदा सर्व पिकांना लागू करावा यासाठी सर्व शेतकरी संघटना एक होऊन लढत आहेत. तरीही मोदी का अडून बसले आहेत. सरकार मागे हटत नाही तोवर शेतकरी मागे हटणार नाहीत, असे शेट्टी म्हणाले.
डॉ. आढाव म्हणाले, “मोदींनी शेतकऱ्यांची जबाबदारी झटकली आहे. तशी हमीभावाची जबाबदारी उद्योजकांवर ढकलली आहे. जुने जे कायदे आहेत ते रद्द करा असे शेतकरी म्हणत आहेत. यात दोष जुन्या कायद्याचा नसून केंद्राच्या नाकारतेपणाचा आहे.” डॉ. प्रकाश आंबेडकर यांनीही शेतकरी आंदोलनास पाठींबा दर्शवला आहे. या संदर्भात शेट्टी म्हणाले, “आपल्यातले वैचारिक मतभेद असतील ते नंतर पाहू. आता शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा आणि मुंबईतील आंदोलनात सहभागी व्हावे. अजून कोणाला आंदोलन करायचे असेल ते करावे. पंतप्रधानांच्या घरासमोर धरणे धरावे. याबाबत आमचे काहीही म्हणणे नाही.”