पुणे : अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मागील वर्षी अर्थसंकल्प सादर करताना २०१६-१७ हे आर्थिक वर्ष ‘शेतकरी स्वाभिमानी वर्ष’ असेल, असे जाहीर केले होते. प्रत्यक्षात मात्र हे वर्ष शेतकऱ्यांना स्वाभिमानी नाही, तर लाचार करणारेच ठरले आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसने केली. मुनगंटीवार यांनी त्या वेळी केलेल्या कोणत्या घोषणा वर्षभरात प्रत्यक्षात आणल्या त्या अर्थसंकल्पाच्या हिशेबातून सादर कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी याबाबतचे पत्रच मुनगंटीवार यांना दिले आहे. त्यात त्यांनी मुनगंटीवार यांनी केलेल्या विविध ३१ घोषणांची यादीच दिली आहे. पालकमंत्री पाणंद रस्ते योजना, ९० हजार विद्युत पंप जोडणी, १ लाख शेततळी, शेतकऱ्यांसाठीचे अल्प व्याजदराचे पीककर्ज, कृषी प्रकल्पांसाठी अनुदान, कृषी मार्गदर्शन योजना या सगळ्यांचे काय झाले? कुठे आहेत या योजना? त्यावर अर्थसंकल्पातील किती पैसे खर्च केले? या सर्वांचा हिशेब नवा अर्थसंकल्प सादर करताना मुनगंटीवार यांनी द्यावा, अशी मागणी लवांडे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
शेतकऱ्यांना स्वाभिमानी नाही, तर लाचार बनवले
By admin | Updated: March 15, 2017 03:30 IST