लक्ष्मण उद्धव शिंदे (वय ५८ , रा.नाथाची वाडी , ता.दौंड) असे मरण पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
अनिल दशरथ नागवडे यांनी याबाबतची खबर यवत पोलिसांना दिली आहे.अनिल नागवडे व मयत लक्ष्मण शिंदे हे दोघेही खामगाव येथे एकमेकांच्या शेजारी खंडाने शेती करत होते. लक्ष्मण शिंदे हे ज्योत्सना प्रभाकर होले (रा.यवत , ता.दौंड) यांच्या मालकीची गट नं.२२० मधील शेती खंडाने करत होते.तर नागवडे त्यांच्या शेजारील हे गट नं.२२१ मधील शेती खंडाने करत होते.
दोघांच्या शेतात यंदा उसाचे पीक होते.यापैकी लक्ष्मण शिंदे यांच्या शेतातील ऊस तोडून नेण्यात आला होता. ऊस तोडून नेल्यानंतर राहिलेल्या पाचटाला काल (दि.२६) रोजी जाळत असताना पेटते पाचट बाजूच्या उसाच्या शेतात गेले. यामुळे नागवडे यांच्या उसाच्या पिकात देखील आग लागली.बाजूच्या उसाला लागलेली आग विझविण्यासाठी लक्ष्मण शिंदे तेथे गेले होते.
अनिल नागवडे हे तेथे गेल्यानंतर उसाच्या शेतात लक्ष्मण शिंदे यांना शोधण्यासाठी गेल्यानंतर शिंदे तेथे भाजलेल्या अवस्थेत मिळून आले.यावेळी त्यांच्या शरीराची कोणतीही हालचाल होत नव्हती.उपचारासाठी त्यांना पीक अप जीपमधून यवत ग्रामीण रुग्णालयात नेले असताना डॉक्टरांनी उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.