शेलपिंपळगाव : राज्यातील भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे बिचारा कष्टकरी शेतकरी देशोधडीला लागला असून शासन फक्त आश्वासनरूपी गाजर दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे. सत्ताधारी पक्ष एकीकडे गुंडांना आश्रय देऊन धनदांडगे बनवत आहे. तर शेतकऱ्यांना जमिनदोस्त करत असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत पवार बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील, जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, युवकचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. शैलेश मोहिते, तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर, सभापती नवनाथ होले उपस्थित होते. पवार म्हणाले, की शिवसेनेने पाठिंबा काढला तर राज्यातील भाजपाचे सरकार अचानक पडून विधानसभेच्या मध्यवर्ती निवडणुका लागू शकतात. खिशात राजीनामे घेऊन फिरणाऱ्या लाचार शिवसेनेच्या मंत्र्यांनी राजीनामे देण्याचे धाडस दाखवावे, असे आवाहन त्यांनी केले.यावेळी दिलीप मोहिते, वसंतराव रेटवडे, संभाजी भाडळे, भालचंद्र रोडे, पठाणराव वाडेकर, सर्जेराव पानसरे, बाळासाहेब कोळेकर, अजय भागवत आदींची भाषणे झाली. फोटोओळ : शेलपिंपळगाव (ता. खेड) येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत बोलताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार. (वार्ताहर)
चुकीच्या धोरणामुळे शेतकरी देशोधडीला : अजित पवार
By admin | Updated: February 17, 2017 04:34 IST