पुणे : गेल्या वर्षभरात शहर आणि परिसरात दररोज एकाहून अधिक व्यक्तींनी रेल्वेखाली आपले प्राण गमावले आहेत. गेल्या वर्षात ५४० नागरिक रेल्वेखाली चिरडले गेले असून, १४५ जण जखमी झाले आहेत. पुणे-लोणावळा मार्गावरील पिंपरी, कासारवाडी, चिंचवड, दापोडी, खडकी आणि आकुर्डी स्टेशन अपघातांच्या दृष्टीने संवेदनशील मानली जातात. रेल्वेच्या वतीने अशा संवेदनशील ठिकाणी सीमाभिंत, जाळीचे अथवा अन्य प्रकारचे अडथळे उभे केले आहेत. मात्र, तरीही नागरीक अन्य मार्गाचा वापर करुन धोकादायक पद्धतीने रेल्वे मार्ग ओलांडताना दिसतात. अशा पद्धतीने मार्ग ओलांडणाऱ्यांवर रेल्वे प्रशासनातर्फे कारवाई केली जाते. गेल्या आर्थिक वर्षांत ६ हजार ९९१ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून तब्बल ७ लाख ३२ हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला असल्याची माहिती रेल्वेचे पुणे मंडल प्रबंधक मिलिंद देऊस्कर यांनी दिली. रेल्वे मार्ग ओलांडण्यातील धोके दाखविण्यासाठी रेल्वेच्या वतीने पथनाट्य सादर केली जातात. या शिवाय बॅनर, पोस्टर आणि फलकद्वारे देखील प्रवाशांचे लक्ष वेधले जाते. मात्र, त्यानंतरही थोडासा वेळ वाचविण्यासाठी जीवाचा धोका पत्करण्यात येतो. अनेकदा कानात हेडफोन घालून रेल्वेमार्ग ओलांडला जातो. त्यामुळे जोखीम आणखी वाढते. एखादा अपघात झाल्यास कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळ जातो. त्यामुळे रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक कोलमडते, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
दररोज एकाचा रेल्वेखाली होतो मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 21:08 IST
रेल्वेच्या वतीने संवेदनशील ठिकाणी सीमाभिंत, जाळीचे अथवा अन्य प्रकारचे अडथळे उभे केले आहेत. मात्र, तरीही नागरीक अन्य मार्गाचा वापर करुन धोकादायक पद्धतीने रेल्वे मार्ग ओलांडताना दिसतात.
दररोज एकाचा रेल्वेखाली होतो मृत्यू
ठळक मुद्देअनेकदा कानात हेडफोन घालून रेल्वेमार्ग ओलांडला जातो. गेल्या वर्षात ५४० नागरिक रेल्वेखाली चिरडले गेले असून १४५ जण जखमी धोकादायक पद्धतीने मार्ग ओलांडणाऱ्यांवर रेल्वे प्रशासनातर्फे कारवाई