पुणे: कला म्हटलं की, तिथे स्थळ काळाची बंधने जशी गळून पडतात, तसंच वयाचं बंधनही नाहीसं होतं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे ९७ वर्षाचं चिरतरूण व्यक्तीमत्व माऊली टाकळकर. ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’त गेल्या कित्येक वर्षांपासून टाळ वादन करत आहेत. पंडित भीमसेन जोशी यांच्याशी त्यांचे खास मैत्र होते. माऊली टाकळकर आजही त्याच उत्साहाने ‘सवाई’मध्ये टाळवादन करत आहेत.
आयुष्याची कित्येक वर्षे भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांना साथ केलेले माऊली टाकळकर ‘सवाई’च्या मंचावर तबला भजनी ठेका धरू लागला, की आजही आपले टाळ घेऊन तिकडे धाव घेतात. दरवर्षीचा त्यांचा हा नित्यनेम आहे. त्यांचा या वयातील उत्साहत पाहून अनेकांना अचंबित होते. इतक्या वर्षांचा अनुभव आपल्या शेजारी साथीला बसलेला पाहून नव्या कलाकारांना अफाट हुरूप येतो आणि अनुभवी कलाकारांना गतकाळातील रम्य आठवणींची उजळणी होते.
टाकळकर म्हणाले,‘‘ मी १९७५ पासून पं. भीमसेन जोशी यांच्यासोबत टाळ वादन करत आहे. त्यांचा पहिला कार्यक्रम मी कल्याणमध्ये वाजवला. त्यांच्यासोबत २०११ पर्यंत मी साथसंगत करत होतो. पण २०११ मध्ये त्यांचे निधन झाले. पंडितजींबरोबर मी दोन ते अडीच हजार संतवाणीचे कार्यक्रम केले. त्यांची माझ्यावर खूप कृपा होती. त्यांच्यासोबत मी भारतात सर्वत्र कार्यक्रम केले. तसेच दुबई, लंडन, सिंगापूर, अमेरिका अशा अनेक देशांमध्येही मला त्यांच्यासोबत फिरायला मिळाले. त्यांच्यासोबत साथसंगत करण्याचा आनंदच निराळा होता. खरोखर खूप मोठे कलावंत होते पंडितजी.’’
...अन् माऊली गहिवरले !
पंडित भीमसेन यांच्यासोबत शेवटपर्यंत वाजवत होतो. हे सांगत असताना टाकळकर यांना खूप गहिवरून आले. त्यानंतर हात जोडून त्यांनी डोळ्यांत आलेला अश्रूंचा बांध तसाच धरून ठेवला. पंडितजींचे मला खूप प्रेम मिळाले, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.